शाळेच्या मुख्याध्यापकाने तात्काळ हिंदीचा पेपर थांबवला
दिवा \ आरती परब : दिव्यातील कुबेरेश्वर महादेव इंग्लिश स्कूल या शाळेत आज तिसरीच्या विद्यार्थ्यांचा हिंदी भाषेचा पेपर असल्याची माहिती मनसेचे शहर सचिव प्रशांत गावडे यांना मिळाली. याबाबत खातरजमा केल्यानंतर मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी शाळेवर धडक देऊन शाळा व्यवस्थापनाला जाबविचारला. त्यानंतर शाळेच्या मुख्याध्यापकाने तात्काळ तिसरीचा हिंदीचा पेपर थांबवला.
इयत्ता १ ली ते ४ थी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना हिंदी शिकवण्याच्या निर्णय शासनाने रद्द केलेला असतानाही अशा प्रकारच्या कुठल्याही शासन निर्णयाची माहितीच नसल्याचे धक्कादायक विधान शाळा व्यवस्थापकांनी केले आहे. दिव्यातील शाळांमध्ये पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांना हिंदी भाषा शिकवली जात असल्याबाबतचे पत्र बुधवारी मनसे नेते अविनाश जाधव आणि शहर अध्यक्ष तुषार पाटील यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने शिक्षण अधिकाऱ्यांना दिले होते. अशा शाळांवर कारवाई करण्याची मागणी देखील करण्यात आली होती.
मनसेच्या विरोधा नंतर कुबेरेश्वर महादेव इंग्लिश स्कूल या शाळाने १ ली ते ४ थी पर्यंतची हिंदी विषयाची परीक्षा तात्काळ स्थगित केली असून भविष्यात अशा प्रकारे कुठलीही कृती करणार नाही अशी लेखी हमी शाळेने दिवा मनसेला दिली आहे. यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे दिवा शहर सचिव प्रशांत गावडे, विभाग अध्यक्ष शरद पाटील, उपविभाग अध्यक्ष सुशांत तांडेल, शाखाध्यक्ष सागर निकम, धनेश पाटील, महादेव पाटील आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.
नेहा तिवारी, मुख्याध्यापक, कुबेरेश्वर महादेव इंग्लिश स्कूल – शाळा सुरू असताना दुपारच्या वेळी दिव्यातील मनसे पदाधिकारी येऊन त्यांनी तिसरीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा घेऊ नये असे सांगताच आम्ही ती थांबवली. तसेच १ ली ते ४ च्या विद्यार्थ्यांना यापुढे आम्ही हिंदी शिकवणार नाही, हे मी मनसे पदाधिकारी यांना पत्राद्वारे लिहून दिले.