महाबळेश्वरच्या स्ट्रॉबेरीला आंतरराष्ट्रीय स्तरावर मिळाली ख्याती
कराड : जगभरात प्रसिद्ध असलेल्या महाबळेश्वरच्या स्ट्रॉबेरीला आता एका नव्या उंचीवर नेण्याचे काम कासवंड गावातील रत्ना आणि डॉ. आशित बावडेकर या दाम्पत्याने केले आहे. त्यांनी अत्यंत कल्पकतेने आणि प्रयोगातून तयार केलेल्या 'अलूरा' (Alurra) या स्ट्रॉबेरी वाईनला आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठी ओळख मिळाली आहे. २८ जुलै २०२५ रोजी ऑस्ट्रेलियातील सिडनी येथे झालेल्या एका प्रतिष्ठित वाईन प्रदर्शनात 'अलूरा'ने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
सिडनी येथे आयोजित 'इंडियन वाईन बायर-सेलर मीट' (IWBSM) मध्ये भारतातील दहा नामांकित वाईन प्रदर्शित करण्यात आल्या होत्या. यामध्ये 'अलूरा' ही एकमेव स्ट्रॉबेरी वाईन होती आणि तिने केवळ सातारा जिल्ह्याचेच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले. 'जेला व्हॅली' या स्ट्रॉबेरी फर्मचे मालक असलेल्या बावडेकर दाम्पत्याने त्यांच्या स्वतःच्या शेतात पिकवलेल्या प्रीमियम इटालियन आणि फ्लोरिडियन स्ट्रॉबेरीपासून ही वाईन तयार केली आहे.
हा अभिनव प्रयोग केवळ वाईन निर्मितीपुरता मर्यादित नसून, तो स्थानिक शेतकऱ्यांसाठीही एक नवी संधी ठरत आहे. बावडेकर दाम्पत्याने भिलारमधील स्ट्रॉबेरी उत्पादक सोसायटी आणि स्थानिक शेतकरी गटांना सोबत घेऊन हे काम सुरू केले आहे. त्यांचे स्थानिक मित्र प्रकाश आबा भिलारे आणि त्यांचा मुलगा गणेश भिलारे यांच्या सहकार्याने ते स्ट्रॉबेरीची लागवड करतात. २०२३ मध्ये, त्यांनी परिसरातील शेतकऱ्यांकडून सुमारे ३.५ टन स्ट्रॉबेरी खरेदी करून इगतपुरी येथील 'टेरोइर वाईनरी'मध्ये पाठवली.
'इंडस वाईन्स'मधील प्रसिद्ध वाईनमेकर अभिजीत कबीर यांच्या मार्गदर्शनाखाली, भारतातील एकमेव 'ग्रॅव्हिटी-फ्लो' वाईनरीमध्ये या स्ट्रॉबेरीपासून 'अलूरा' वाईन तयार करण्यात आली. ही एक 'फुल-बॉडी बुटीक वाईन' असून, फ्रेंच वाईन निर्मितीच्या पारंपारिक पद्धतीने बनवलेली हलकी आणि संतुलित 'रोझे' (Rosé) आहे. मर्यादित प्रमाणात उत्पादन होत असल्याने ही एक विशेष वाईन मानली जाते.
सध्या मुंबई, पुणे, पाचगणी आणि महाबळेश्वरमध्ये उपलब्ध असलेल्या 'अलूरा'ची निवड 'वाईन ग्रोअर्स असोसिएशन ऑफ इंडिया' (WGAI) चे अध्यक्ष अश्विन रॉड्रिग्ज यांनी आंतरराष्ट्रीय वाईन मेळ्यासाठी केली होती. या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश भारतीय वाईनला जागतिक बाजारपेठेत ओळख मिळवून देणे आणि भारतीय शेतीला वाईन निर्मितीचा एक महत्त्वाचा स्रोत म्हणून स्थापित करणे हा आहे. या यशामुळे आंतरराष्ट्रीय वाईनच्या नकाशावर भारताचे स्थान अधिक मजबूत होण्यास मदत होणार आहे.