महिला बचत गटांना मिळाला आर्थिक आधार
ठाणे : पावसाळ्यात नैसर्गिकरित्या उगवणाऱ्या पौष्टिक आणि औषधी रानभाज्यांना शहरी बाजारपेठ मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाने (उमेद) पुढाकार घेतला आहे. या अभियानांतर्गत आज ठाण्यातील टेंभी नाका येथील बी. जे. हायस्कूलमध्ये 'रानभाज्या महोत्सव २०२५-२६' यशस्वीपणे आयोजित करण्यात आला. या महोत्सवामुळे ग्रामीण भागातील स्वयंसहायता गटांच्या महिलांना आर्थिक उत्पन्न मिळवण्यास मोठी मदत झाली.
या एकदिवसीय महोत्सवाचे उद्घाटन ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्या हस्ते करण्यात आले. "रानभाज्यांचा हा उत्सव म्हणजे आपल्या समृद्ध ग्रामीण संस्कृती, आरोग्यदायी जीवनशैली आणि महिलांच्या आत्मनिर्भरतेचा सोहळा आहे. या उपक्रमातून ग्रामीण महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम होतात आणि त्यांचा आत्मविश्वास वाढतो, हेच या महोत्सवाचे खरे यश आहे," असे गौरवोद्गार घुगे यांनी काढले.
महोत्सवात जिल्ह्याच्या दुर्गम व जंगली भागांतील १०० महिलांनी ५० स्टॉल्सच्या माध्यमातून सहभाग नोंदवला. त्यांनी आघाडा, शेवळा, कुरकुरी भाजी, भारंग, करटोली, टाकळा, शेवगा यांसारख्या अनेक दुर्मिळ व पौष्टिक भाज्या विक्रीसाठी आणल्या होत्या. या भाज्यांचे आरोग्यदायी महत्त्व लक्षात घेता, ठाणेकरांनी खरेदीसाठी मोठी गर्दी केली.
या विक्रीतून महिलांना एकूण ६३,१८० रुपयांचा निव्वळ नफा झाला. ही संपूर्ण रक्कम थेट सहभागी महिलांना देण्यात आली, ज्यामुळे त्यांच्या आर्थिक सक्षमीकरणाला हातभार लागला, अशी माहिती प्रकल्प संचालक छायादेवी शिसोदे यांनी दिली.
या कार्यक्रमाला प्रकल्प संचालक छायादेवी शिसोदे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश फडतरे व प्रमोद काळे, जिल्हा कृषी अधिकारी एम.एम. बाचोटिकर, शिक्षणाधिकारी देविदास महाजन यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. या उपक्रमामुळे पारंपरिक भाज्यांचे संवर्धन, आरोग्य जनजागृती आणि ग्रामीण महिलांना उत्पन्नाचे हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्याचा उद्देश सफल झाला आहे.