महावितरण व आपत्ती व्यवस्थापन विभागाची तत्परता
कोल्हापूर / शेखर घोंगडे : राधानगरी तालुक्यात दूधगंगा नदीला आलेल्या पूरामुळे गेल्या दोन दिवसांपासून वाळवा उपकेंद्र ठिकपुर्ली गावठाण फिडरवरील पाच गावांमध्ये वीजपुरवठा खंडित झाला होता. महावितरण व आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या समन्वयाने अखेर या ५ गावांचा व ठिकपुर्ली फिडरचा वीजपुरवठा आज दुपारी सुरळीत करण्यात आला.
महावितरणचे राधानगरी उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता ओंकार डांगे यांनी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाशी समन्वय साधून वीजपुरवठा पुनर्संचयित करण्याची मोहीम राबवली. दुपारी ३ वाजता शाखा अभियंता सुहास शेंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली लाईनस्टाफ सुरज पाटील, विकास पाटील, अक्षय चौगुले, विनोद आळवेकर व सागर शिंदे यांनी बोटीच्या सहाय्याने नदीपात्र ओलांडून काम हाती घेतले.
या मोहिमेत आपत्ती व्यवस्थापन पथकातील जवान कृष्णात सोरटे, शैलेश हांडे व प्रीतम पाटील यांनी बोटीद्वारे नदीपात्रातून जाण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली. पूरपाण्यात अडकलेल्या वीजवाहिन्यांवरील झाडांच्या फांद्या काढणे, पाण्याखाली गेलेल्या तारांची दुरुस्ती करणे अशा आव्हानात्मक कामांनंतर शेवटी फिडरचा वीजपुरवठा पूर्ववत करण्यात आला.
महावितरण व आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या समन्वयाने ही अत्यंत जोखमीची कामगिरी यशस्वीरीत्या पूर्ण झाल्याने संबंधित गावांमध्ये पुन्हा उजेड परतला आहे.