आमदार चित्रा वाघ यांनी भेट देऊन समाधान व्यक्त केले
नवी मुंबई : महाराष्ट्र विधान परिषदेच्या सदस्या आमदार श्रीमती चित्रा वाघ यांनी नवी मुंबई महानगरपालिकेच्या (NMMC) घणसोली येथील बेघर निवारा केंद्राला भेट देऊन पाहणी केली व केंद्राच्या कामकाजाबद्दल समाधान व्यक्त केले. निराधारांचा आधारस्तंभ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या केंद्राने केलेल्या कार्याचे त्यांनी कौतुक केले.
आमदार वाघ यांनी केंद्रातील लाभार्थी महिलांशी संवाद साधून त्यांना पुरविण्यात येणाऱ्या सोयी-सुविधांची माहिती घेतली. महिलांनी सकाळी नाश्ता, दुपारचे व रात्रीचे जेवण, तसेच नियमित आरोग्य तपासणी आणि औषधोपचार वेळेवर मिळत असल्याचे सांगितले. वाघ यांनी महिलांच्या पार्श्वभूमीची आणि त्यांना निवारा केंद्रात येण्याच्या कारणांची आस्थेने चौकशी केली.
केंद्रातील सुरक्षा व्यवस्थेची पाहणी करताना त्यांनी पूर्णवेळ सुरक्षा रक्षक आणि कार्यरत सीसीटीव्ही कॅमेऱ्यांबद्दल समाधान व्यक्त केले. यामुळे महिला सुरक्षित असल्याची भावना त्यांनी बोलून दाखवली. महानगरपालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली हे बेघर निवारा केंद्र उत्तम प्रकारे चालवले जात असल्याबद्दल त्यांनी प्रशंसा केली.
समाजविकास विभागाचे उपायुक्त किसनराव पलांडे यांनी माहिती दिली की, हे केंद्र १५ मार्च २०२४ पासून घणसोली सेक्टर ४ येथील स्वतंत्र इमारतीत सुरू करण्यात आले आहे. सध्या येथे ४८ महिला, ४८ पुरुष आणि २ बालकांसह एकूण ९८ बेघर नागरिक वास्तव्यास आहेत.
या भेटीवेळी त्यांच्यासोबत नमुंमपा समाजविकास विभागाचे उपायुक्त किसनराव पलांडे आणि कोपरखैरणे पोलीस स्टेशनच्या गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक उन्मेश थिटे हेही उपस्थित होते.