तरुणाच्या डोक्यात लोखंडी सळई घुसली; तरुण गंभीर जखमी
बांधकाम कंत्राटदाराला ५० लाखांचा दंड
भिवंडी : भिवंडीतील धामणकर नाका परिसरात सुरू असलेल्या मेट्रो लाईन ५ च्या कामादरम्यान मोठी दुर्घटना घडली. मंगळवारी दुपारी २२ वर्षीय सोनू रामजन अली या तरुणाच्या डोक्यात मेट्रोच्या कामातून पडलेली ३ ते ४ फूट लांब आणि २० मिमी जाडीची लोखंडी सळई थेट घुसली. सोनू गंभीर जखमी असून, त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
सोनू अली हा भिवंडीतील विठ्ठल नगरमध्ये राहत असून, मूळचा उत्तर प्रदेशातील प्रतापगडचा रहिवासी आहे. भिवंडीतील एका बांधकाम साईटवर तो मजूर म्हणून काम करत होता. घटनेच्या दिवशी तो रिक्षाने भांडारी कंपाऊंडकडे जात असताना अजमेर नगर मशीदजवळ ही दुर्घटना घडली.
सहप्रवाशांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनू आणि त्याचे मित्र बागे फिरदोस येथून रिक्षाने धामणकर नाका येथे आले होते. त्यानंतर दुसऱ्या रिक्षातून पुढच्या गंतव्याकडे जात असताना, मेट्रोच्या कामातून वरून पडलेली सळई थेट सोनूच्या डोक्यात घुसली. रक्तबंबाळ अवस्थेत असूनही तो शुद्धीत होता, आणि स्थानिकांनी तातडीने त्याला रुग्णालयात दाखल केले.
उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितले की, सळई सुमारे २ ते ३ इंच डोक्यात घुसली आहे. रुग्णाची स्थिती गंभीर असून, पुढील ४८ ते ७२ तास अत्यंत निर्णायक असतील. या घटनेनंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी धामणकर नाक्यावर रस्ता रोको करत संबंधित ठेकेदारावर एफआयआर दाखल करण्याची मागणी केली.
भोईवाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक रत्नप्राखी यांनी घटनेची पुष्टी करत सांगितले की, सळई अर्धवट कापण्यात आली आहे. प्रकरणाचा सविस्तर तपास सुरू आहे. या दुर्घटनेमुळे मेट्रो प्रकल्पातील सुरक्षेच्या हलगर्जीपणावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, स्थानिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
एमएमआरडीएची तातडीने कारवाई
- घटनेची गंभीर दखल घेत मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) ने संबंधित कंपन्यांवर कारवाई केली आहे.
- बांधकाम कंत्राटदार ‘ऍफकॉन्स’ ला ५० लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
- सल्लागार कंपनी ‘सिस्ट्रा-सीईजी-सिस्ट्रा’ वर ५ लाख रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे.
- याशिवाय, पीडित तरुणाच्या उपचारांचा संपूर्ण खर्च उचलण्याचे आणि अतिरिक्त आर्थिक मदत देण्याचे निर्देश एमएमआरडीएने संबंधित कंपनीला दिले आहेत.
- या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्यासाठी स्वतंत्र समिती गठीत करण्यात आली आहे.