शहरातील रस्त्यांची कामे प्राधान्याने पूर्ण करा

Maharashtra WebNews
0

 – सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले

नांदेड, दि. 1 ऑगस्ट – शहरातील रस्त्यांची कामे प्राधान्याने पूर्ण करताना मनपा व सार्वजनिक बांधकाम विभागांनी समन्वय ठेवून नागरिकांना त्रास होणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे निर्देश सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिले. आज शासकीय विश्रामगृहातील बैठक कक्षात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्ह्यातील विविध विकास कामांचा आढावा घेण्यात आला.

या बैठकीस खासदार डॉ. अजित गोपछडे, महापालिका आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे, सार्वजनिक बांधकाम मंडळाचे अधीक्षक अभियंता संभाजी धोत्रे, कार्यकारी अभियंते रामकृष्ण गळधर (नांदेड), प्रशांत कोरे (परभणी), दिंगाबर पोत्रे (हिंगोली), विशाल चोपडे (भोकर) आणि संदीप कोटलवार (देगलूर) यांची उपस्थिती होती.

शहरातील रस्त्यांची कामे करताना नागरिकांना अडथळा निर्माण होणार नाही याची काळजी घेण्यात यावी, असे सांगताना मंत्री भोसले यांनी मनपा आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्यात समन्वय असणे अत्यावश्यक असल्याचे सांगितले. त्यांनी रस्त्यांची कामे तात्काळ पूर्ण करण्यावर भर देण्याचे निर्देश दिले. जिल्ह्यात फक्त वृक्षलागवड न करता वृक्षसंवर्धनावर भर देण्याचेही त्यांनी सुचवले.

काही तालुक्यातील रस्ते अत्यंत खराब अवस्थेत असून देवस्थान, धार्मिक व वर्दळीच्या ठिकाणी असलेल्या रस्त्यांच्या कामांना प्राधान्य देण्याचे त्यांनी स्पष्ट केले. दरवर्षी दुरुस्ती लागणाऱ्या रस्त्यांमध्ये टिकाऊपणा येण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे निर्देश त्यांनी दिले. रस्त्यांवर दिशादर्शक फलक लावणे, पोलीस वसाहतीच्या इमारतीची दुरुस्ती, नांदेड शहरातील चौकांचे सुशोभीकरण, शिवाजीनगर भागातील ड्रेनेजची कामे, टोल नाक्यावरील बोगस पावत्यांवर कारवाई आदी मुद्द्यांवर तातडीने कार्यवाही करण्यास सांगितले.

शासनाच्या 100 दिवसांच्या मोहिमेत सार्वजनिक बांधकाम विभागाने चांगले काम केले असून आता 150 दिवसांच्या मोहिमेत विभागाने अव्वल कामगिरी बजावावी, याची जबाबदारी प्रत्येक अधिकाऱ्याने स्वीकारावी, असेही मंत्री भोसले यांनी सुचवले. या बैठकीत अधीक्षक अभियंता संभाजी धोत्रे यांनी नांदेड, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यांतील प्रस्तावित विकास कामे, मनुष्यबळ व रिक्त पदांच्या भरतीविषयी सादरीकरणाद्वारे माहिती दिली.

यानंतर मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी तख्त सचखंड श्री हुजूर साहिब गुरुद्वारा येथे जाऊन गुरुग्रंथ साहिब यांचे दर्शन घेतले. गुरुद्वारा बोर्डाच्यावतीने त्यांचा पारंपरिक पद्धतीने केसरी चोला व शिरोपा देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी खासदार डॉ. अजित गोपछडे व इतर मान्यवर उपस्थित होते.

तसेच, नांदेड येथील कौठा-असर्जन भागात उभारण्यात येत असलेल्या न्यायालयाच्या नवीन इमारतीच्या कामाचीही मंत्री भोसले यांनी पाहणी केली. हे काम सध्या प्रगतीपथावर असून त्याचा आढावा घेत संबंधित अधिकाऱ्यांना दर्जेदार आणि वेळेत काम पूर्ण करण्याचे निर्देश दिले.


#नांदेड #शिवेंद्रसिंहराजेभोसले #सार्वजनिकबांधकाम #रस्त्यांचीकामे #विकासकामे #गुरुद्वारादर्शन #न्यायालयइमारत #महत्त्वाच्याबैठका

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)