शिवसेना ठाकरे पक्ष आक्रमक
दिवा \ आरती परब : डायघर गावातील डम्पिंग ग्राऊंडवर शुक्रवारी पहाटे धक्कादायक प्रकार समोर आला. मुंबईतील दीड दिवसाच्या गणपती विसर्जन झालेल्या शंभर ते दीडशे ट्रकमधील मूर्ती येथे विल्हेवाटीसाठी आणल्या गेल्या. या अमानुष कृत्यामुळे स्थानिक ग्रामस्थांनी संताप व्यक्त करत गाड्या परतवून लावल्या.
या घटनेवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) तर्फे तीव्र निषेध नोंदवण्यात आला आहे. जिल्हाप्रमुख दिपेश पुंडलिक म्हात्रे म्हणाले, “स्वतःला हिंदुत्ववादी म्हणवणारे सरकारच जर आपल्या आराध्य दैवत गणरायाचा अपमान करत असेल तर तो महाराष्ट्र कधीही सहन करणार नाही. जबाबदार अधिकाऱ्यांवर तात्काळ गुन्हे दाखल व्हायला हवेत. गणरायाचा अपमान करणाऱ्यांना जागेवर आणल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही.”
कल्याण ग्रामीण विधानसभा प्रमुख रोहिदास मुंडे यांनीही संताप व्यक्त करून म्हटलं की, गणपती बाप्पा हे महाराष्ट्राच्या घराघरात पूजले जाणारे आराध्य दैवत आहेत. विसर्जनानंतर मूर्तींचा अवमान हा धार्मिक भावनांचा अपमान आहे. संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करावेत. या असंवेदनशील शासनाचा विसर्जनाचा दिवस लांब नाही.