मुंबई : देशातील गृहनिर्माण बाजारपेठेसाठी येणारा सणासुदीचा हंगाम वरदान ठरणार असल्याचे संकेत मिळत आहेत. गणेशोत्सवापासून दिवाळीपर्यंतचा काळ पारंपरिकदृष्ट्या घरांच्या खरेदीसाठी सर्वाधिक अनुकूल मानला जातो आणि वार्षिक विक्रीत जवळपास एकतृतीयांश वाटा उचलतो. २०२५ ची पहिली सहामाही तुलनेने स्थिर राहिली असली, तरी सणासुदीच्या हंगामात विकासकांकडून नवीन प्रकल्पांची लॉन्चिंग, आकर्षक ऑफर्स आणि खरेदीदारांच्या वाढलेल्या उत्साहामुळे बाजारपेठेत नव्या चैतन्याची लाट दिसत आहे.
आरईए इंडिया (हाऊसिंग डॉटकॉम) चे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण शर्मा यांनी सांगितले की, मध्यम व प्रीमियम सेगमेंटमधील सातत्यपूर्ण मागणी, ग्राहकांच्या आत्मविश्वासातील वाढ आणि जीवनशैलीवर आधारित प्रकल्पांकडे कल या घटकांमुळे या वर्षीचा सणासुदीचा मोसम गृहनिर्माण क्षेत्रासाठी केवळ मोसमी पुनरुज्जीवन ठरणार नसून २०२६ पर्यंत वाढीस चालना देणारा ठरेल.
गेल्या पाच वर्षांच्या आकडेवारीनुसार सप्टेंबर ते डिसेंबर ही तिमाही घरांच्या विक्रीसाठी सर्वात मजबूत ठरली आहे. विकासक या काळात प्रकल्पांची लॉन्चिंग व ऑफर्स आणतात, तर खरेदीदार मोठ्या खरेदीचा निर्णय पुढे नेतात. म्हणूनच चौथी तिमाही वार्षिक विक्रीत निर्णायक ठरते.
२०२० ते २०२४ दरम्यानच्या आकडेवारीवरून चौथ्या तिमाहीतील विक्रीने एकूण वार्षिक विक्रीत २५ ते ३० टक्के वाटा उचलला आहे. अगदी कोविडनंतरच्या आव्हानात्मक काळातही चौथ्या तिमाहीत तिसऱ्या तिमाहीच्या तुलनेत ३२ टक्के वाढ झाली होती. बहुतांश वेळा या मोसमामुळे व्यवहार १० ते १५ टक्क्यांनी अधिक वाढले आहेत.
यावरून, २०२५ च्या चौथ्या तिमाहीत घरांच्या मागणीचा वाटा वार्षिक विक्रीत किमान ३० टक्के असेल, असा अंदाज व्यक्त केला जात असून, पहिल्या सहामाहीतील संथ गतीनंतरही या काळात बाजारपेठ नव्या जोमाने पुढे सरसावेल, असा उद्योग क्षेत्राचा विश्वास आहे.