‘मॅरेथॉन ठाण्याची.. उर्जा तरुणाईची!’
१० ऑगस्ट रोजी होणार भव्य आयोजन
२५ हजारांहून अधिक धावपटूंना अपेक्षा
ठाणे : ठाणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित करण्यात येणारी राज्यभर प्रसिद्ध वर्षा मॅरेथॉन यंदा १० ऑगस्ट २०२५ रोजी भव्य स्वरूपात पार पडणार आहे. यंदा ही स्पर्धा ‘मॅरेथॉन ठाण्याची.. उर्जा तरुणाईची!’ या घोषवाक्याखाली घेण्यात येणार असून, या ३१व्या वर्षी सुमारे २५ हजारांहून अधिक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय धावपटूंचा सहभाग अपेक्षित आहे.
या वर्षी देखील २१ किमी पुरुष व महिला विभाग तसेच १८ वर्षावरील १० किमी स्पर्धेसाठी टाईम टेक्नॉलॉजीचा वापर करण्यात येणार आहे. या तंत्रज्ञानामुळे धावपटूंचा वेळ अचूकपणे नोंदवता येणार आहे, असे स्पष्ट करण्यात आले.
या स्पर्धेची माहिती बुधवारी महापालिकेच्या कै. नरेंद्र बल्लाळ सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आली. या वेळी अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांनी अधिक माहिती देताना सांगितले की, “मॅरेथॉनमधून ठाण्याच्या सामाजिक आणि आरोग्यदृष्ट्या जाणीवशीलतेचा परिचय मिळतो. त्यामुळे या स्पर्धेत महापालिकेचे अधिकारी-कर्मचारी, पत्रकार, व नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे.”
पत्रकार परिषदेला उपायुक्त उमेश बिरारी, मीनल पालांडे, तसेच मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रसाद पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. ठाणे मॅरेथॉन ही केवळ एक स्पर्धा नसून, आरोग्य, क्रीडा, पर्यावरण आणि नागरी सहभाग यांचा संगम ठरलेली आहे. शहराच्या सांस्कृतिक ओळखीचा एक अविभाज्य भाग बनलेली ही मॅरेथॉन वर्षानुवर्षे ठाणेकरांसाठी एक अभिमानाचा क्षण ठरली आहे.