समाज कल्याण अधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र प्रदान



शासकीय सेवेच्या माध्यमातून जनसेवेचे कार्य  - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाने आपल्यावर मोठी जबाबदारी सोपवली आहे. शासनामध्ये अधिकारी म्हणून काम करत असताना जनतेने दिलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडणे हीच खरी लोकशाहीची ताकद आहे. शासकीय सेवेच्या माध्यमातून जनसेवेचे कार्य आपल्या हातून घडावे, राज्याच्या विकासात आपले योगदान महत्त्वाचे ठरावे, अशी अपेक्षा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली.


सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागात महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत निवड झालेल्या २२ समाज कल्याण अधिकारी (गट-ब) अधिकाऱ्यांना प्रथम नियुक्तीपत्र मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते सह्याद्री अतिथीगृह येथे प्रदान करण्यात आले. या कार्यक्रमास सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट, राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर, प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे, समाज कल्याण आयुक्त दीपा मुधोळ-मुंडे, संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक प्रेरणा देशभ्रतार, बार्टीचे महासंचालक सुनील वारे तसेच विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.


मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की सामाजिक न्याय विभाग हा समाजातील वंचित घटकांसाठी कार्य करणारा अत्यंत महत्त्वाचा विभाग आहे. समाजातील शेवटच्या घटकाची सेवा करण्याची संधी या विभागात काम करताना मिळते. समाजातील सर्व घटक जोपर्यंत मुख्य प्रवाहात येत नाहीत तोपर्यंत आपण सर्वांगीण विकासाचे स्वप्न पूर्ण करू शकणार नाही. प्रामाणिकपणे काम करून समाजातील शेवटच्या घटकाच्या आयुष्यात परिवर्तन घडवावे, असे आवाहनही मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले.


मंत्री संजय शिरसाट म्हणाले की शासकीय सेवेत आल्यामुळे अधिकाऱ्यांवरील जबाबदारी वाढली आहे. जनतेप्रती प्रामाणिक राहून जनतेची सेवा करण्याचे कार्य आपल्या हातून होणार आहे. कुणाचे तरी भले करण्याची क्षमता आपल्यात निर्माण झाली असून समाजाच्या ऋणातून उतराई होण्याची संधी शासकीय सेवेमुळे मिळाली आहे. या संधीचे सोने करावे, असे आवाहनही मंत्री शिरसाट यांनी यावेळी केले.

Post a Comment

Previous Post Next Post