दिवा \ आरती परब : ठाणे महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी जाहीर झालेल्या मसुदा वॉर्ड रचनेवर आज सेव्ह दिवा फाउंडेशनने तीव्र हरकत नोंदवली आहे. फाऊंडेशनचे अध्यक्ष ॲड. रोहिदास मुंडे यांनी शेवटच्या दिवशी आयुक्तांकडे सविस्तर निवेदन सादर करून प्रभाग क्रमांक २७, २८, २९ आणि ३० मधील अन्यायकारक विभागणीविरोधात जोरदार आक्षेप घेतला.
विभागणीतील अन्याय
ॲड. मुंडे यांनी सांगितले की, प्रभाग क्र. २९ मध्ये २७ व २८ मधील काही भागांचा कृत्रिम समावेश करण्यात आला आहे. यामुळे त्या प्रभागाची भौगोलिक सलगता तुटली असून, लोकसंख्येतील असमतोल स्पष्टपणे दिसून येतो. परिणामी प्रभाग क्र. ३० वर १५ ते १८ टक्के अतिरिक्त लोकसंख्येचा भार पडला आहे. “ही रचना कायदेशीर निकषांच्या विरोधात असून, नागरिकांच्या न्याय्य प्रतिनिधित्वावर आघात करणारी आहे,” असे त्यांनी ठामपणे स्पष्ट केले.
कायदेशीर आक्षेप
फाऊंडेशनच्या निवेदनात महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील कलम ५(३), कलम ६ व ७अ तसेच भारतीय राज्यघटनेतील अनुच्छेद १४ आणि अनुच्छेद २४३टी यांचा भंग झाल्याचे निदर्शनास आणले आहे. याशिवाय राज्य निवडणूक आयोगाने २९ डिसेंबर २०२१ रोजी दिलेल्या आदेशानुसार ±१०% लोकसंख्या मर्यादा पाळली गेली नाही, असा पुराव्यानिशी दावा करण्यात आला आहे.
लोकशाही हक्कांची हाक
“एक मत = एक मूल्य या लोकशाही तत्त्वावर गदा येऊ देणार नाही. ठाण्याच्या नागरिकांच्या हक्कांसाठी आम्ही लढा देऊ. जर ही रचना दुरुस्त झाली नाही, तर न्यायालयापर्यंत जाण्यास आम्ही मागेपुढे पाहणार नाही,” असा इशारा ॲड. रोहिदास मुंडे यांनी दिला.
फाऊंडेशनची मागणी
प्रभाग क्र. २७ व २८ मधून काढलेले भाग पुन्हा मूळ प्रभागात परत द्यावेत. प्रभाग क्र. २९ पूर्ववत ठेवून त्यास कौसापर्यंत जोडावे. सर्व प्रभागांमध्ये न्याय्य संतुलन निर्माण होईल आणि नागरिकांचे प्रतिनिधित्व अधिक प्रामाणिकपणे होईल, असे फाऊंडेशनचे मत आहे.