१०.५३ लाखांचा मुद्देमाल जप्त
कोल्हापूर LCB ची मोठी कारवाई
कोल्हापूर \ शेखर धोंगडे : राज्यात बंदी असलेली गोवा बनावटीची दारू कुरिअर कंटेनरमधून महाराष्ट्रात आणून विक्रीसाठी नेणाऱ्या इसाक खुदबुद्दीन मुजावर ( ५१, रा. सुभाषनगर, कोल्हापूर) या रेकॉर्डवरील गुन्हेगाराला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या (LCB) पथकाने गडमुडशिंगी परिसरात सापळा रचून अटक केली.
या कारवाईत टाटा कंटेनर गाडीसह एकूण १० लाख ५३ हजार ४७५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्यामध्ये विदेशी दारूच्या ९३ बाटल्यांचा समावेश असून, त्यांची किंमत तब्बल ५३ हजार ४७५ रुपये इतकी आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी मुजावर हा डिलीवरी कुरिअर कंपनीच्या साहित्याच्या आडून टाटा कंटेनर (MH14-JL-8818) मधून गोवा बनावटीची विदेशी दारू घेऊन गडमुडशिंगीकडे जात होता. उचगाव-गडमुडशिंगी रोडवर सापळा रचून LCB च्या पथकाने त्याला पकडले.
कंटेनरच्या केबिनमध्ये सापडलेल्या दारूमध्ये सिग्नेचर प्रिमीअर, ब्ल्यू अँड गोल्ड, अमेरिकन प्राईड, रॉयल चॅलेंज, वोल्डमंक आणि इम्पीरियल ब्ल्यू या नामांकित ब्रॅण्डच्या बाटल्यांचा समावेश आहे.
आरोपी इसाक मुजावर हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून, त्याच्यावर कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, महाड जिल्ह्यांसह गुजरातमध्ये चोरी, अपहरण आणि संघटित गुन्हेगारी कायद्यांतर्गत १५ हून अधिक गुन्हे दाखल आहेत. गुजरातमध्ये त्याच्यावर मोक्का अंतर्गतही कारवाई करण्यात आली आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक योगेशकुमार सो व अप्पर पोलीस अधीक्षक बी. धिरजकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ व अंमलदार सुरेश पाटील, अमित मर्दाने, संजय पडवळ, रुपेश माने, विनोद कांबळे यांच्या पथकाने केली. पुढील तपास गांधीनगर पोलीस ठाण्यात सुरू आहे.