टोरंट पॉवरच्या मनमानी विरोधात धडाकेबाज युवा प्रतिष्ठानचा इशारा
दिवा \ आरती परब : दिवा शहरातील सामान्य जनतेच्या खिशाला झळ पोहोचवत टोरंट पॉवर कंपनी मनमानी पद्धतीने वागत असल्याचा आरोप करत धडाकेबाज युवा प्रतिष्ठान, महाराष्ट्र राज्य यांनी आज तीव्र आवाज उठवला.
साधारण पंधरा ते वीस हजारांचा पगार मिळवणाऱ्या कुटुंबांवर घरखर्च, मुलांचे शिक्षण, कर्जाचे हप्ते अशा ताणांमुळे आर्थिक ओझे आधीच आहे. त्यातच एका महिन्याचे बिल थकले तरी टोरंटचे कर्मचारी घरात राहणाऱ्या लोकांना विचारणा न करता वीज तोडतात, तसेच उध्दटपणे बोलतात, असा रहिवाशांचा आरोप आहे. पुन्हा वीज जोडण्यासाठी नागरिकांना अन्यायकारकपणे २१० रुपये जादा भरावे लागतात.
यात भर म्हणजे प्रति युनिट तब्बल दीड रुपयांची वाढ करण्यात आल्याचे समजताच नागरिकांनी संताप व्यक्त केला. हा अन्याय तात्काळ थांबवावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष अमोल धनराज केंद्रे व सचिव अश्विनी अमोल केंद्रे यांनी दिला.