जळगाव : जळगाव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी सोमवारी ग्रामपंचायत विभागाला अचानक भेट देत विभागातील कामकाजाची झाडाझडती घेतली. या भेटीदरम्यान त्यांनी कार्यालयीन शिस्त, पारदर्शकता आणि कार्यक्षमतेची पाहणी केली.
या वेळी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक आर. एस. लोखंडे तसेच उपमुख्य कार्यकारी अधिकारी भाऊसाहेब अकलाडे उपस्थित होते. सीईओ करनवाल यांनी विभागातील कर्मचाऱ्यांच्या डेस्कवरील फाईलींची तपासणी करून प्रलंबित कामे, फाईल प्रक्रिया व शासकीय पत्रव्यवहाराचा आढावा घेतला.
मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी कर्मचाऱ्यांना कार्यालयीन शिस्त आणि कार्यक्षमतेत सुधारणा घडवून आणण्याच्या सूचना दिल्या. तसेच नागरिकांच्या अर्जांवर वेळेत कार्यवाही व्हावी, यावर विशेष भर दिला. “कार्यालयीन शिस्त, पारदर्शकता आणि कार्यक्षमतेत कोणतीही तडजोड चालणार नसल्याचे मीनल करनवाल, मुख्य कार्यकारी अधिकारी, जळगाव जिल्हा परिषद यांनी सागितले.
सीईओंच्या या अचानक भेटीमुळे ग्रामपंचायत विभागात एकप्रकारची हालचाल निर्माण झाली असून, कार्यालयीन कामकाजात अधिक काटेकोरता व गतिमानता येईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.