दहा तासांनी नियंत्रणात
भिवंडी : भिवंडी तालुक्यातील ग्रामीण भागातील लोनाड ग्रामपंचायत हद्दीतील पॅरामाउंट वेअरहाऊस संकुलात रविवारी रात्री दहा वाजताच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत संकुलातील कुरिअर गोदाम आणि नजीकचे केमिकल साठवलेले गोदाम ज्वालांमध्ये बुडाले.
घटनेची माहिती मिळताच भिवंडी महापालिका, कल्याण डोंबिवली व उल्हासनगर पालिका तसेच जिंदाल स्टील कंपनीचे अग्निशामक दल घटनास्थळी दाखल झाले. गोदामात केमिकल असल्यामुळे आग रौद्र रूपाने पसरत होती, तर ग्रामीण भागातील पाणीपुरवठा मर्यादित असल्याने अग्निशमन कार्यात अडथळे आले.
अग्निशामक दलाच्या जवानांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांनंतर दहा तासांनी आग नियंत्रणात आणली जाऊ शकली. तरीही, गोदामाचे छत कोसळल्यामुळे त्याखाली आग काही वेळा धुमसत राहिली. प्राथमिक माहिती नुसार, शॉर्ट सर्किट हा आगीचे कारण असल्याचे समोर आले आहे.
सुदैवाने, रात्रीची वेळ असूनही या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही, अशी माहिती प्रशासनाने दिली आहे.