राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार पक्ष) ठाणे अध्यक्षपदी मनोज प्रधान



ठाणे :  राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार पक्ष) ठाणे शहर जिल्हाध्यक्षपदी नगरसेवक आणि ज्येष्ठ नेतृत्व मनोज प्रधान यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाचे ज्येष्ठ नेते डाॅ. जितेंद्र आव्हाड यांचे निकटवर्तीय असलेल्या प्रधान यांच्या नियुक्तीची घोषणा प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी मुंबईत केली.


डाॅ. आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाच्या ठाणे जिल्हा मध्यवर्ती कार्यालयात कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत विद्यमान कार्याध्यक्ष प्रकाश पाटील यांनी अध्यक्षपदासाठी मनोज प्रधान यांचे नाव सुचविले. त्यास सर्व कार्यकर्त्यांनी एकमताने अनुमोदन दिले. त्यानंतर औपचारिकरित्या प्रधान यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले.




मनोज प्रधान हे ठाण्यातील मितभाषी, शांत पण प्रभावी संघटक म्हणून ओळखले जातात. उच्चशिक्षित असलेले प्रधान यांनी काही काळ ठाणे महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून काम केले असून, त्यांनी आपल्या कार्यकाळात विविध सामाजिक आणि विकासकामांत सक्रीय सहभाग नोंदविला आहे.


काँग्रेस विचारधारेतून राजकीय प्रवास सुरू केलेले प्रधान हे विद्यार्थी जीवनापासून सामाजिक आणि राजकीय चळवळींशी जोडलेले आहेत. काँग्रेस एकसंघ असताना त्यांनी युवक काँग्रेसच्या ठाणे शहराध्यक्षपदाची धुरा सांभाळली होती. पक्षनिष्ठा, कार्यकर्त्यांशी जवळीक आणि संघटन कौशल्य यामुळेच त्यांना आता राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) ठाणे अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.


या नियुक्तीमुळे ठाण्यातील राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, पक्षाच्या संघटनात्मक बळकटीस नवी दिशा मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.







Post a Comment

Previous Post Next Post