शिवशक्ती रिक्षा युनियनचा उपक्रम
दिवा \ आरती परब : दिवा शहरातील शिवशक्ती रिक्षा युनियनच्या वतीने यंदा दिवाळीच्या पार्श्वभूमीवर रिक्षाचालक व मालकांना फराळ साहित्याचे वाटप करण्यात आले. या उपक्रमाद्वारे युनियनने रिक्षाचालक बांधवांना सणाच्या शुभेच्छा देत सामाजिक बांधिलकी जपली.
या कार्यक्रमात शिवशक्ती रिक्षा युनियनचे अध्यक्ष विनोद भगत व श्रीराम भगत यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. यावेळी बोलताना अध्यक्ष विनोद भगत म्हणाले की, “शिवशक्ती रिक्षा युनियन दरवर्षी रिक्षा चालक व मालकांसाठी विविध सामाजिक उपक्रम राबवत असते. त्यांच्या आरोग्याची काळजी घेत युनियनच्या माध्यमातून आरोग्य शिबिरे, तपासण्या तसेच विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. दिवा शहरातील कोणताही रिक्षा चालक कधीही एकटा पडणार नाही, युनियन नेहमी त्यांच्या पाठीशी उभी राहील,” असे त्यांनी सांगितले.
या प्रसंगी युनियनचे खजिनदार प्रवीण बार्शीकर, श्रीराम भगत यांच्यासह शेकडो रिक्षाचालक व मालक उपस्थित होते. या उपक्रमामुळे रिक्षाचालकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.