दिवा \ आरती परब: दिवाळीच्या पार्श्वभूमीवर खरेदीसाठी बाहेर पडलेल्या नागरिकांच्या मोठ्या गर्दीमुळे दिवा रेल्वे स्टेशन परिसरात शुक्रवारी दुपारी वाहतूक पूर्णतः कोलमडली. गाड्यांच्या लांबच लांब रांगा, रस्त्यांवरील अव्यवस्था आणि बाजारात वाढलेली गर्दी यामुळे संपूर्ण परिसर ठप्प झाला. या कोंडीचा परिणाम रेल्वे वाहतुकीवरही झाला, परिणामी सीएसएमटी आणि कल्याण दिशेने जाणाऱ्या लोकल गाड्या जवळपास पंचवीस मिनिटे दिवा स्टेशनच्या अप आणि डाऊन दोन्ही बाजूंनी थांबल्या.
कल्याण, डोंबिवली आणि आसपासच्या भागांतून दिवाळीची खरेदी करण्यासाठी आलेल्या नागरिकांना अचानक गाड्या थांबल्याने मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागला. उकाडा, प्रचंड गर्दी आणि प्लॅटफॉर्मवरील झुंबड यामुळे प्रवाशांची अवस्था बिकट झाली होती. दुपारी सव्वा एकच्या सुमारास दिवा पूर्वेतील दिवाळी बाजारात खरेदीदार आणि वाहनांची एकाच वेळी झालेली गर्दी नियंत्रणाबाहेर गेली. अरुंद रस्त्यांमध्ये अडकलेल्या जड वाहनांमुळे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली.
या वाहतूककोंडींत दुचाकी आणि कारचालकांनी स्वतःचा मार्ग काढण्याचा प्रयत्न करत गर्दी अधिकच वाढवली. मुंब्रा, ठाणे आणि डोंबिवलीकडे जाणारी वाहने हाच मार्ग वापरत असल्याने संपूर्ण परिसरात वाहतुकीचा ताण निर्माण झाला.
दरम्यान, रेल्वे फाटक बंद करण्याची वेळ आल्यावर अनेक वाहने फाटकाच्या मधोमध अडकली. परिणामी, रेल्वे कर्मचाऱ्यांना फाटक जबरदस्तीने उघडे ठेवावे लागले, ज्याचा थेट परिणाम लोकल गाड्यांच्या ये-जा वर झाला.
परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेल्यानंतर रेल्वे कर्मचारी आणि रेल्वे पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न केले, परंतु गर्दी ओसरायला वीस ते पंचवीस मिनिटे उलटून गेली.