महिला व बालविकास विभागांतर्गत 'पोषण भी पढ़ाई भी' प्रशिक्षण उपक्रम

 



ठाणे जिल्ह्यात उत्साहपूर्ण प्रतिसाद 

३८१ अंगणवाडी सेविका प्रशिक्षणात सहभाग


 ठाणे : महिला व बालविकास विभागांतर्गत राबविण्यात येत असलेल्या “पोषण भी पढ़ाई भी” या राज्यस्तरीय प्रशिक्षण उपक्रमाला ठाणे जिल्ह्यात उल्लेखनीय आणि उत्साहपूर्ण प्रतिसाद मिळत आहे. या प्रशिक्षणाचा उद्देश अंगणवाडी सेविकांना बाल पोषण, आरोग्य, शिक्षण आणि सर्वांगीण विकासाच्या संकल्पनेविषयी सर्वसमावेशक मार्गदर्शन देणे असा आहे.


सदर प्रशिक्षण कार्यक्रमाचा कालावधी ६ ऑक्टोबर ते १५ डिसेंबर २०२५ असा निश्चित करण्यात आला असून, ठाणे जिल्ह्यातील एकूण ३३८१ अंगणवाडी सेविका या प्रशिक्षणात सहभागी झाल्या आहेत.


ठाणे जिल्ह्याचे प्रशिक्षण नियोजन

ठाणे जिल्ह्यात कार्यरत असलेल्या १७ एकात्मिक बाल विकास सेवा योजना (ICDS) प्रकल्पांतील सर्व सेविकांसाठी हे प्रशिक्षण टप्प्याटप्प्याने आयोजित करण्यात आले आहे. प्रत्येक बॅचमध्ये १०० ते १०५ सेविका सहभागी होत असून, प्रशिक्षणादरम्यान पोषण, स्वच्छता, आरोग्य, शालेयपूर्व शिक्षण, बालसुरक्षा आणि सामाजिक जाणीवा यांसारख्या महत्त्वपूर्ण विषयांवर सैद्धांतिक तसेच प्रात्यक्षिक मार्गदर्शन दिले जात आहे.



 प्रशिक्षणाची उद्दिष्टे

अंगणवाडी सेविकांना बाल पोषण, आरोग्य, स्वच्छता आणि शैक्षणिक क्रियाकलापांवरील अद्ययावत ज्ञान व कौशल्य देणे.

शालेयपूर्व शिक्षण व बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी सेविकांची कार्यक्षमता आणि आत्मविश्वास वाढविणे.

ग्रामीण व शहरी भागांतील बालकांना अधिक गुणवत्तापूर्ण सेवा उपलब्ध करून देण्यासाठी अंगणवाडी प्रणाली सशक्त करणे.


 प्रशिक्षणाचे आयोजन

हा उपक्रम ठाणे जिल्हा परिषद आणि महिला व बालविकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने, संबंधित बालविकास प्रकल्प अधिकारी व मान्यताप्राप्त प्रशिक्षण संस्था यांच्या सहकार्याने राबविण्यात येत आहे. प्रशिक्षण स्थळी सेविकांसाठी आवश्यक सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या असून, विषयतज्ज्ञ प्रशिक्षकांकडून सखोल आणि प्रत्यक्ष मार्गदर्शन दिले जात आहे.


 जिल्हा कार्यक्रम अधिकाऱ्यांचे मत

जिल्हा कार्यक्रम अधिकारी (महिला व बालविकास), जिल्हा परिषद ठाणे संजय बागुल यांनी सांगितले की, ‘पोषण भी पढ़ाई भी’ प्रशिक्षण सध्या ठाणे जिल्ह्यात यशस्वीपणे सुरू आहे. या माध्यमातून अंगणवाडी सेविकांना नवीन कौशल्ये, कार्यपद्धती आणि बालस्नेही दृष्टिकोन दिला जात आहे. ग्रामीण भागातील बालकांच्या आरोग्यदायी आणि उज्ज्वल भविष्यासाठी हा उपक्रम अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.








Post a Comment

Previous Post Next Post