भिवंडी : पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत आज कोनगाव पोलीस ठाणे आणि अस्मिता टेक्स्टाईल कंपाऊंड येथे वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला. या उपक्रमाचे उद्घाटन माननीय पोलीस उपायुक्त शशिकांत बोराटे (परिमंडळ २, भिवंडी) यांच्या हस्ते करण्यात आले.
या प्रसंगी पोलीस अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सामाजिक जबाबदारी आणि पर्यावरण रक्षणाची जाणीव ठेवत कोनगाव पोलीस ठाण्याकडून आतापर्यंत एकूण २०५ झाडांची लागवड करण्यात आली आहे. आजच्या उपक्रमात एकूण ५५ झाडांची लागवड करण्यात आली असून, सर्व झाडांचे जिओ टॅगिंग पूर्ण करण्यात आले आहे.
या माध्यमातून प्रत्येक झाडाची देखभाल, वाढ आणि स्थिती यावर सातत्याने लक्ष ठेवले जाणार आहे. पोलीस उपायुक्त शशिकांत बोराटे यांनी या प्रसंगी सांगितले की, पर्यावरणाचे रक्षण ही आजची काळाची गरज आहे. वृक्ष लागवड ही केवळ औपचारिकता नसून भविष्यासाठी दिलेले आपले एक वचन आहे. प्रत्येक पोलीस कर्मचारी आणि नागरिकाने हरित उपक्रमात सहभाग घेऊन स्वच्छ, निरोगी आणि हिरवेगार भिवंडी निर्माण करण्यासाठी योगदान द्यावे.”
या उपक्रमात स्थानिक नागरिक, उद्योग प्रतिनिधी आणि पोलीस कर्मचारी यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.
‘एक वृक्ष – एक जीव’ या भावनेतून पार पडलेल्या या कार्यक्रमाने हरित भिवंडीच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल टाकले आहे.