शिवसेना व मनसेची निवडणूक जिल्हाधिकाऱ्याकडे मागणी
दिवा \ आरती परब : कल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्रातील दिवा शहर परिसरातील मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर दुबार नावे नोंदविल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले असून या संदर्भात आज दिवा शहरातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षांच्या वतीने संयुक्त निवेदन देत तातडीने कारवाईची मागणी करण्यात आली.
पक्षांकडून देण्यात आलेल्या माहितीप्रमाणे, वार्ड क्र. २७ आणि २८ क्षेत्रामध्ये केलेल्या प्राथमिक तपासणीत एकूण १७,२५८ इतकी दुबार नावे आढळली आहेत. ही बाब निवडणुकीची पारदर्शकता धोक्यात आणणारी असून मतदार यादीतील विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणाची सखोल चौकशी करून सर्व दुबार नावे तात्काळ मतदार याद्यांमधून वगळावीत, तसेच सुधारित यादी सार्वजनिकपणे उपलब्ध करून द्यावी, अशी ठाम मागणी जिल्हा निवडणूक अधिकारी वैशाली माने यांच्याकडे करण्यात आली.
तसेच, भविष्यात होणाऱ्या पुनरावलोकन प्रक्रियेमध्ये अशा प्रकारच्या नोंदी पुन्हा होऊ नयेत यासाठी स्थानिक अधिकाऱ्यांना स्पष्ट व काटेकोर मार्गदर्शक सूचना देण्यात याव्यात, अशीही मागणी पक्षांकडून करण्यात आली आहे.
दिवा शहरातील मतदार याद्यांवरून उद्भवलेल्या या गंभीर प्रकरणावर प्रशासनाने तातडीने निर्णय घेऊन कायदेशीर कार्यवाही करावी, अशी अपेक्षाही संयुक्त निवेदनातून व्यक्त करण्यात आली आहे. यावेळी निवेदन देताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कल्याण ग्रामीण विधानसभा प्रमुख ऍड. रोहिदास मुंडे, विधानसभा संघटिका योगिता नाईक, मनसे दिवा शहराध्यक्ष तुषार पाटील, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहर प्रमुख सचिन पाटील, उपशहर प्रमुख मारुती पडळकर आदी उपस्थित होते.
