कलाकारांचा शाल- श्रीफळ देऊन सन्मान
दिवा \ आरती परब : दिवाळीच्या शुभसंध्येला शिवाजी मंदिर हॉल येथे ‘यम- कली संग्राम’ या भव्य दशावतार नाट्य प्रयोगाचे यशस्वी आयोजन स्मित हरी प्रोडक्शन हरी पाटणकर आणि उमेश धुरी यांच्याकडून करण्यात आले होते.
या कार्यक्रमात श्री दादा राणे (कोनसकर), उदय राणे (कोनसकर), आबा कलिंगण, बाळा कलिंगण, प्रथमेश खवणेकर, सचिन हडकर, प्रसाद तवटे या नाट्य क्षेत्रातील लोकप्रिय कलाकारांनी सादर केलेल्या उत्कृष्ठ अभिनयाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. तर स्त्री कलाकार – कोकणातील सौंदर्यवर्ती कु. यश जळवी, पवन वालावलकर यांच्या प्रभावी अभिनयाची विशेष दाद मिळाली.
‘ओम वीरभद्र दशावतार नाट्य मंडळ’ या संस्थेचे मालक प्रवीण धुरी आणि उमेश धुरी यांनी संस्थेचे संस्थापक कै. गोपाळ धुरी यांच्या स्मरणार्थ या कार्यक्रमात दादा राणे (कोनसकर), तसेच दशावतार चित्रपटातील स्त्री कलाकार कु. यश जळवी यांना शाल, श्रीफळ आणि सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. तसेच इतर सर्व कलाकारांचा सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. या प्रसंगी उपस्थित नाट्यरसिकांनी कलाकारांना उत्स्फूर्त प्रतिसाद देत कार्यक्रमाला यशस्वी केले. तर कै. बाबी कलिंगण प्रस्तुत कलेश्वर दशावतार नाट्य मंडळ नेरुर यांचे कडून विशेष सहकार्य लाभले.
या कार्यक्रमाला विशेष सहकार्य शरद साईल, उद्योजक, दादर आणि धर्माजी कुबल यांचे लाभले. दशावतार परंपरेला आधुनिकतेची जोड देणारा हा नाट्यप्रयोग ठरला असून, यम आणि कली यांच्यातील संघर्षाचे प्रभावी सादरीकरण रंगमंचावर पाहून प्रेक्षक भारावून गेले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आयोजक, तंत्रज्ञ, संगीतसाथी आणि सर्व सहकाऱ्यांचे विशेष कौतुक व्यक्त करण्यात आले. तर कार्यक्रमाचे समालोचन उमेश घोगळे यांनी केले होते.

