टोरंट वीज कंपनीच्या मनमानीविरोधात जनतेचा आक्रोश
दिवा : दिवा शहरातील नागरिकांवर टोरंट वीज कंपनीच्या मनमानी कारभारामुळे वाढती आर्थिक व सामाजिक पिळवणूक होत असल्याचा निषेध म्हणून समाजसेवक अमोल केंद्रे आणि नागरिकांकडून ‘धडक मोर्चा’ काढण्यात येणार आहे.
हा मोर्चा दि. १७ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी १० वाजता बेडेकर नगर येथील लो- प्राईज मार्ट येथून सुरू होऊन चंद्रांगण टॉवर (टोरंट ऑफिस) येथे जाणार आहे.
आंदोलनकांच्या मते, टोरंट कंपनीने वीजदरांमध्ये अनावश्यक वाढ करून सर्वसामान्य जनतेवर अन्याय केला आहे. या मनमानी कारभाराविरोधात दिवा शहरातील नागरिकांचा संताप उफाळला असून मोठ्या प्रमाणावर जनआंदोलन उभे राहणार आहे.
‘धडक मोर्चा’च्या प्रमुख मागण्या:
१ प्रति युनिट वाढवलेले ₹१.५० रद्द करावे. म्हणजेच, ज्या घराचे बिल आधी ₹1000 होते ते आता ₹1500 झाले आहे. ही वाढ तत्काळ मागे घेण्यात यावी.
२ लाईट कट केल्यानंतर पुन्हा जोडण्यासाठी घेतले जाणारे ₹210 शुल्क रद्द करावे.
३ तीन महिने बिल न भरल्यावर लाईट कट करण्याची अट लागू करावी.
आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे की, “टोरंट कंपनीच्या मनमानीला आळा बसला पाहिजे; अन्यथा हा लढा अधिक तीव्र केला जाईल.”