अखेर दिव्यातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातून बस सेवा पुन्हा सुरू!

 



मनसेच्या मागणीला यश; नागरिकांमध्ये समाधानाची भावना

दिवा \ आरती परब  : दीर्घ प्रतीक्षेनंतर अखेर दिवा पूर्वेतील छत्रपती शिवाजी महाराज चौकातून बस सेवा पुन्हा सुरू करण्यात आली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या प्रयत्नांना यश मिळाल्याने नागरिकांमध्ये समाधानाची भावना व्यक्त होत आहे.


गेल्या ४ ते ५ महिन्यांपासून रस्त्याचे व पाण्याच्या लाईनचे काम सुरू असल्यामुळे बस सेवा छत्रपती शिवाजी महाराज चौकातून बंद करण्यात आली होती. त्यामुळे बससेवा सुमारे एक किलोमीटर दूर असलेल्या नॅशनल शाळेजवळून सुरू होती. या बदलामुळे शाळकरी मुले, महिला, वयस्कर नागरिक तसेच गर्भवती महिलांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत होता.


रस्त्याचे काम पूर्ण होऊनही बस सेवा पूर्ववत न झाल्याने त्याचा फटका सर्वसामान्यांना बसत होता. त्या संदर्भात दिवा मनसेचे शहर सचिव प्रशांत गावडे यांनी २३ सप्टेंबर २०२५ रोजी ठाणे महानगरपालिका परिवहन विभागाकडे लेखी निवेदन देऊन हा प्रश्न तातडीने सोडवण्याची मागणी केली होती. त्यानंतर परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्थळ पाहणी करून लवकरच बस सेवा पूर्ववत करण्याचे आश्वासन दिले होते.


त्याच पार्श्वभूमीवर आजपासून दिवा पूर्वेतील पुन्हा छत्रपती शिवाजी महाराज चौकातून बस सेवा सुरू करण्यात आली आहे. या निर्णयाबद्दल दिवा मनसे आणि नागरिकां तर्फे परिवहन सेवेच्या अधिकाऱ्यांचे आभार व्यक्त करण्यात आले.


Post a Comment

Previous Post Next Post