पाचोरा-भडगाव मतदारसंघातील शेतकऱ्यांना दिलासा
वनमंत्री गणेश नाईक यांचे आश्वासन
भडगाव : पाचोरा-भडगाव मतदारसंघातील शेतकऱ्यांना सध्या जंगलातील हिंस्त्र प्राण्यांचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या प्राण्यांमुळे शेतकऱ्यांचे शेतीपिकांचे तसेच पाळीव जनावरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असून, शेतकरी बांधवांकडून वनक्षेत्राभोवती कंपाऊंड उभारणीची मागणी सातत्याने होत आहे.
या गंभीर प्रश्नाचा पाठपुरावा करत आमदार किशोर आप्पा पाटील यांनी राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांची मंत्रालयात भेट घेऊन विशेष बैठक आयोजित केली. या बैठकीस वन विभागातील संबंधित वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. बैठकीत शेतकऱ्यांच्या सुरक्षेसाठी वनक्षेत्रात कंपाऊंड बांधण्याचा प्रस्ताव, तसेच वन विभागाशी निगडित इतर प्रलंबित कामांवर सविस्तर चर्चा झाली.
बैठकीदरम्यान वनमंत्री गणेश नाईक यांनी सकारात्मक भूमिका घेत शेतकऱ्यांच्या सुरक्षेसाठी व शेतीपिकांच्या रक्षणासाठी आवश्यक ती पावले उचलली जातील असे स्पष्ट केले. तसेच, कंपाऊंड बांधकामाचे काम लवकरच मार्गी लागेल असेही आश्वासन दिले.
या बैठकीमुळे मतदारसंघातील शेतकरी वर्गात समाधानाची भावना व्यक्त होत असून, शेतकऱ्यांच्या सुरक्षेसाठी ही बैठक महत्त्वपूर्ण ठरणार आहे, असा विश्वास आमदार किशोर आप्पा पाटील यांनी व्यक्त केला.