मानवी हातांनी तयार केलेल्या प्रतिकृतींचा सर्वात मोठा डिजिटल फोटो अल्बम
कोल्हापूर : महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) यांच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या भव्य ‘अमृत दुर्गोत्सव 2025’ या उपक्रमाने गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये जागतिक नोंद केली आहे.
या उपक्रमाने मानवी हातांनी तयार केलेल्या प्रतिकृतींचा सर्वात मोठा डिजिटल फोटो अल्बम (Largest digital photo album of hand-made sculptures) हा नवा विक्रम प्रस्थापित केला असून, शिवछत्रपतींच्या दुर्गसंस्कृतीला लोकसहभागातून अभिवादन करणारा हा पहिलाच जागतिक विक्रम ठरला आहे. जागतिक विक्रम संस्थेने याबाबतचे अधिकृत प्रमाणपत्र अमृतचे व्यवस्थापकीय संचालक विजय जोशी यांना प्रदान केले.
शिवप्रेरणेने भारलेला लोकउत्सव
अमृत दुर्गोत्सव 2025 हा उपक्रम संपूर्णपणे शिवप्रेरणेने प्रेरित होता. महाराष्ट्रातील सर्वच वयोगटातील—अबालवृद्धांनी—या उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. फक्त महाराष्ट्रच नव्हे, तर अमेरिका, इंग्लंड, आखाती देश, तसेच शेजारील राज्यांतूनही नागरिकांनी मोठ्या संख्येने आपले योगदान पाठवून या उपक्रमाला जागतिक पातळीवर एक वेगळे स्थान मिळवून दिले.
दुर्गसंस्कृतीचा जागतिक गौरव
गड-दुर्गांच्या परंपरेवर, शिवछत्रपतींच्या शौर्यावर आणि महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवावर आधारित असलेला हा उपक्रम प्रत्यक्ष लोकसहभागातून एक लोकोत्सव बनला. शिवमहाराजांच्या गड-दुर्गांचा सन्मान करणाऱ्या प्रतिकृतींच्या डिजिटल संग्रहाला गिनीज वर्ल्ड रेकॉर्डकडून मिळालेली दाद ही महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारशासाठी मोठी गौरवाची बाब ठरली आहे.
