पशुसंवर्धन विभागाच्या उपक्रमांची सविस्तर पाहणी
शेतकरी व पशुपालकांशी संवाद साधत अत्याधुनिक सुविधांचा लाभ घेण्याचे आवाहन
नांदेड : नांदेड तालुक्यातील नाळेश्वर पशुवैद्यकीय दवाखान्याच्या कार्यक्षेत्रातील राहाटी (बु.) गावाला जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी भेट देत पशुसंवर्धन विभागाद्वारे राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकरी आणि पशुपालकांशी संवाद साधत आधुनिक तंत्रज्ञानाचा व्यापक वापर करण्याचे आवाहन केले.
जिल्हाधिकाऱ्यांनी नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्ड (एनडीडीबी), दिल्लीमार्फत उपलब्ध करून देण्यात आलेल्या कृत्रिम रेतन सुविधांची तपासणी केली. कृत्रिम रेतनाद्वारे जन्मलेल्या कालवडीची पाहणी करत त्यांनी पशुपालकांनी उच्च वंशावळीच्या गायी-कालवडी तयार करण्यासाठी या सेवांचा अधिकाधिक लाभ घ्यावा, असे सांगितले.
पंतप्रधान सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजनेअंतर्गत सुरू असलेल्या दिगंबर के. बोकारे यांच्या पनीर निर्मिती उद्योगाची त्यांनी पाहणी केली. दररोज सुमारे ४०० लिटर दुधापासून १८० किलो ताजे, भेसळमुक्त पनीर तयार करून नांदेडला पुरवठा करण्याचे या उद्योगाचे मॉडेल जिल्हाधिकाऱ्यांनी कौतुकास्पद असल्याचे म्हटले.
नांदेड जिल्ह्यात सुरु होणाऱ्या विदर्भ–मराठवाडा दूध विकास प्रकल्प टप्पा-2, महिला मराठवऱ्हाड दूध उत्पादक कंपनीचे उपक्रम आणि एनडीडीबीमार्फत उभारण्यात येणाऱ्या बायोगॅस प्रकल्पांचा पशुपालकांनी लाभ घ्यावा, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
नांदेडमध्ये कृत्रिम रेतनाचे प्रमाण दुपटीने वाढविण्यासाठी सुरु असलेल्या नियंत्रित प्रजनन कार्यक्रमाची त्यांनी पाहणी केली. “एक गाव – एक फार्म” ही संकल्पना आधार मानून प्रकल्पाची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
भेटीदरम्यान जिल्हाधिकारी कर्डिले यांनी मराठवऱ्हाड दूध उत्पादक कंपनीचे सहाय्यक ज्ञानोबा बोकारे, तसेच माधव मारोती बोकारे आणि दिगंबर केशवराव बोकारे यांच्याशी संवाद साधत त्यांच्या कामाचा आढावा घेतला. या पाहणी दौऱ्यात जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. राजकुमार पाडिले, पशुधन विकास अधिकारी डॉ. दीप्ती एम. चव्हाण, आणि कृत्रिम रेतन तंत्रज्ञ परसराम जमदाडे उपस्थित होते.
Tags : #Maharashtra DGIPR #Collector Office, Nanded #विभागीय माहिती कार्यालय, लातूर #Nanded Police


