एसटी महामंडळाच्च्याया मोकळ्या जागेवर सौर ऊर्जा प्रकल्प




 एसटी महामंडळाचा अभिनव उपक्रम

मुंबई  : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) आता स्वावलंबनाकडे मोठे पाऊल टाकले आहे. एसटी महामंडळाच्या ताब्यातील मोकळ्या जागांवर तसेच कार्यशाळा व बसस्थानकांच्या छतांवर ‘सौर ऊर्जा प्रकल्प’ उभारण्याचा महत्त्वाकांक्षी निर्णय घेण्यात आला आहे. या माध्यमातून वर्षाला सुमारे ३०० मेगावॅट वीज निर्मिती करून सुमारे १,००० कोटी रुपयांची आर्थिक बचत करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.

हा निर्णय महामंडळाच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत घेण्यात आला असून, या बैठकीस एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. भविष्यात इलेक्ट्रिक बससेवेचा विस्तार झाल्यानंतर एसटीला अजून २८० मेगावॅट वीजेची आवश्यकता भासणार आहे. त्यामुळे एकूण ३०० मेगावॅट क्षमतेच्या सौरऊर्जा प्रकल्पांद्वारे ही वीज निर्मिती करण्यात येणार आहे.



या उपक्रमाच्या माध्यमातून एसटी महामंडळाने राज्यात ‘सौर ऊर्जा हब’ उभारण्याचा संकल्प केला आहे. महामंडळाच्या मालकीच्या जागांवर सार्वजनिक-खाजगी भागीदारीत विविध विकास प्रकल्प राबविण्याची योजना तयार करण्यात आली आहे. या प्रकल्पांबरोबरच उरलेल्या मोकळ्या जागांमध्ये ‘सौर ऊर्जा शेती’ उभारून मोठ्या प्रमाणात वीज निर्मिती करण्यात येणार आहे.

सध्या एसटी महामंडळाला आपल्या दैनंदिन कामकाजासाठी सुमारे १५ मेगावॅट वीज लागते. या वापरासाठी दरवर्षी महावितरण कंपनीला २५ ते ३० कोटी रुपयांचे बिल भरावे लागते. महामंडळाकडून निर्मित होणारी ही वीज स्वतःच्या वापरासाठी तसेच अतिरिक्त वीज विक्रीसाठी उपयोगात आणता येईल. त्यामुळे वर्षाकाठी सुमारे १,००० कोटी रुपयांची बचत होऊन एसटी महामंडळ आर्थिकदृष्ट्या सक्षम होईल. एसटी महामंडळाचा हा ‘ग्रीन इनिशिएटिव्ह’ उपक्रम पर्यावरणपूरक, टिकाऊ आणि भविष्यातील ऊर्जास्रोत निर्माण करणारा प्रकल्प ठरणार आहे. राज्यातील इतर सार्वजनिक संस्थांसाठीही हा प्रकल्प पथदर्शक ठरेल, असा विश्वास व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर यांनी व्यक्त केला.




Post a Comment

Previous Post Next Post