जैन मुनी निलेशचंद्र विजय यांचा थेट इशारा
मुंबई : दादर येथील ऐतिहासिक कबुतरखाना बंद ठेवल्याच्या विरोधात जैन मुनी निलेशचंद्र विजय यांनी आता आक्रमक भूमिका घेतली आहे. मुंबई महानगरपालिकेच्या निर्णयाविरोधात त्यांनी आझाद मैदानावर आमरण उपोषणास सुरुवात केली असून, "आम्हाला नवीन कबुतरखाने नकोत; महापालिकेने फक्त दादरचा कबुतरखाना उघडावा, अन्यथा ‘मरते दम तक वो हम खोलके रहेंगे’," असा थेट आणि निर्वाणीचा इशारा त्यांनी दिला आहे.
मुनी निलेशचंद्र विजय यांनी सांगितले की, जीवदयेसाठी सुरू केलेल्या या उपोषणावर ते ठाम आहेत आणि आंदोलनासाठी त्यांना अधिकृत परवानगी मिळाली आहे.
मुंबई महानगरपालिकेने नुकतीच कबुतरांना नियंत्रित पद्धतीने खाद्य टाकण्यासाठी शहरातील चार ठिकाणी परवानगी दिली आहे. मात्र या पर्यायी व्यवस्थेबाबत जैन समाजाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. मुनी निलेशचंद्र विजय म्हणाले की, “हा विषय फक्त जैन समाजापुरता मर्यादित नाही. करुणा, दया आणि जीवमात्रांविषयी आदर असणाऱ्या प्रत्येक धर्मीयांच्या भावनांशी हा विषय संबंधित आहे. न्यायालयाचा आदेश असला तरी सरकारने तोडगा काढण्याचा मार्ग शोधणे गरजेचे आहे. मात्र, तोडगा निघत नसल्याने आता रस्त्यावर उतरावे लागले आहे.”
मुनींनी पुण्यातील बोर्डिंग प्रकरण आणि विलेपार्लेतील मंदिर बंदीचे उदाहरण देत, “कबुतरांच्या संवर्धनाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे,” अशी खंत व्यक्त केली. “दादर कबुतरखान्यावर लावलेली ताडपत्री आम्ही स्वतः काढूनच राहू,” असे ठाम विधान करून त्यांनी महापालिकेला थेट आव्हान दिले.
या वक्तव्यामुळे दादर कबुतरखाना प्रकरणाला नवा वळण मिळाले असून, आंदोलन हिंसक वळण घेण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सध्या आझाद मैदान परिसरात पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. जैन समाजातील भाविक मोठ्या संख्येने मैदानावर दाखल होत असून, प्रशासनाकडून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे.
मुंबई महापालिका आणि राज्य सरकारकडून या आंदोलनाबाबत अद्याप अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. त्यामुळे दादर कबुतरखान्याचा प्रश्न आणखी चिघळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
