भाजपचे आगरी-कोळी-भूमिपुत्र प्रेम फक्त निवडणुकीपुरतं !




मनसे नेते राजू पाटील यांचा भाजपवर हल्लाबोल

मुंबई  : “निवडणुका आल्या की भाजपला आगरी-कोळी आणि भूमिपुत्र बांधव आठवतात, पण सत्ता मिळाल्यावर त्यांचा विसर पडतो!” असा तीव्र आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी आमदार राजू पाटील यांनी भाजपवर केला आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील साहेबांचे नाव देण्याच्या मागणीवरून ते भाजपवर तुटून पडले. “जर खरंच आमच्या बांधवांचा एवढाच पुळका आहे, तर आजपर्यंत विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव का दिले गेले नाही?” असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला.

पाटील यांनी भाजपच्या आश्वासनांवर टीका करताना सांगितले की, “भाजपने २७ गावं कल्याण-डोंबिवली महापालिकेतून वगळण्याचे आश्वासन दिले होते. त्यावेळी संघर्ष समितीतील सदस्यांना पक्षात घेऊन सत्तेच्या खुर्च्या मिळवल्या, पण आज त्या गावांच्या विकासासाठी जाहीर केलेले ६,५०० कोटी रुपये निधीपैकी एक छदामही दिला नाही.” तसेच या गावांसाठी स्वतंत्र नगरपालिका स्थापन करण्याचा विषय सर्वोच्च न्यायालयात सडवत ठेवण्यात आला, असा आरोपही त्यांनी केला. “आमच्या भूमिपुत्र बांधवांच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम भाजप करत आहे,” अशी टीका करत त्यांनी नाराजी व्यक्त केली.


राजू पाटील यांनी काही मतदारांची नावे जाहीर करून वाद निर्माण करण्यामागे भाजपच्या अंतर्गत राजकारणाचाही संदर्भ दिला. “ज्या मतदारांची नावे सांगितली आहेत, त्यांचा पुनरुच्चार करून तुम्ही तुमच्या पक्षातीलच मंत्र्याला अडचणीत आणून त्यांच्या पदावर डोळा ठेवला आहे का?” असा सवाल त्यांनी उपस्थित करत टोला लगावला. दुबार मतदार याद्यांवर बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, “पांडे, देशपांडे, पठाण असो की पाटील  दुबार नावे वगळा, हीच आमची भूमिका आहे.” पण आगरी-कोळी समाजाच्या भावनांशी खेळ करणं आणि त्यांच्या संघर्षाचा राजकीय फायदा घेणं ही भाजपची सवय झाल्याचं त्यांनी ठामपणे सांगितलं.


राजू पाटील यांनी आपल्या भाषणाचा शेवट तिखट शब्दांत करत म्हटलं, “भाजपला जेव्हा मतांची गरज असते, तेव्हा आम्ही ‘आपले बांधव’ असतो; पण निवडणूक संपली, सत्ता मिळाली की मग ‘कोण बांधव?’ असाच प्रश्न विचारतात. ही त्यांची पारंपरिक भूमिका झाली आहे.” मनसे नेत्यांच्या या हल्लाबोलानंतर ठाणे, नवी मुंबई आणि रायगड परिसरातील आगरी-कोळी समाजात असंतोषाची लाट उमटल्याचे दिसून येत आहे. भाजपकडून या आरोपांवर अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.







Post a Comment

Previous Post Next Post