दिवा \ आरती परब : दिवा शहरासह ठाणे जिल्ह्यात आणि संपूर्ण महाराष्ट्रात रेशन दुकानदारांकडून नागरिकांची होत असलेली लूट थांबविण्याची मागणी करत धडाकेबाज युवा प्रतिष्ठान, महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष अमोल केंद्रे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देण्यात आले आहे.
या निवेदनात दिवा शहरातील रेशन दुकानदार नागरिकांना कमी प्रमाणात गहू आणि तांदूळ देत असल्याची तसेच उर्मटपणे वागणूक दिल्याची तक्रार करण्यात आली आहे. अन्नसुरक्षा योजनेनुसार प्रत्येक व्यक्तीस २ किलो गहू आणि ३ किलो तांदूळ मिळणे अपेक्षित आहे, मात्र वास्तवात त्याचे काटेकोर पालन होत नाही. दिवा येथील सेंट मेरी शाळेजवळील शिधा पाटप दुकान (क्र. U-MUM ४८ फ ११३) येथे नागरिकांची फसवणूक होत असल्याचे प्रत्यक्ष पाहणी दरम्यान निदर्शनास आले आहे.
सदर दुकानाचे लायसन्स दुसऱ्या व्यक्तीच्या नावावर असून प्रत्यक्षात तिसरेच व्यक्ती दुकान चालवत असल्याची माहिती निवेदनात नमूद करण्यात आली आहे. प्रत्येक नागरिकाला एक किलो गहू किंवा तांदूळ कमी देत असल्याची तक्रार देखील करण्यात आली आहे. याशिवाय नागरिकांना “KYC केलेली नाही”, “राशन कार्ड दुसऱ्या ठिकाणचे आहे” अशा कारणांनी फसवणूक करून रेशनिंगमधील भ्रष्टाचार सुरू असल्याचे निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.
तसेच ठाणे जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात अशा प्रकारचे प्रकार सुरू असून रेशनिंगमधील गहू व तांदळाच्या गुणवत्तेत सुधारणा करण्याची मागणी करण्यात आली आहे. भ्रष्टाचार करणाऱ्या रेशन दुकानदारांचे लायसन्स तात्काळ रद्द करून कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
याशिवाय निवेदनात राशन कार्डासाठी लागणाऱ्या उत्पन्न मर्यादेत वाढ करण्याची मागणी देखील करण्यात आली आहे. सध्या वार्षिक उत्पन्न मर्यादा एक लाख रुपये असून ती मर्यादा तीन लाख रुपयांपर्यंत वाढवावी, अशी विनंती निवेदनात करण्यात आली आहे. “दिवसेंदिवस वाढणाऱ्या जीवनमानामुळे बिगारी व इतर कामगार वर्गाचे उत्पन्न एक लाखांपेक्षा जास्त असते, त्यामुळे अनेकांना शासकीय योजनांचा लाभ मिळत नाही,” असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
निवेदनात मुख्यमंत्री फडणवीस यांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन सामान्य नागरिकांना त्यांच्या हक्काचे रेशन मिळवून देण्यासाठी तात्काळ कार्यवाही करावी, धडाकेबाज युवा प्रतिष्ठान, महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष अमोल केंद्रे यांच्याकडून अशी मागणी करण्यात आली आहे.

.jpeg)