नवीन वर्षात ठाणे रेल्वे स्थानक प्रवाशांसाठी सोयीस्कर होणार



ठाणेकरांसाठी सुरु असलेली विकासकामे पूर्णत्वाच्या मार्गावर — खासदार नरेश म्हसके


ठाणे : ठाणे रेल्वे स्थानकाचा चेहरामोहरा दिवसेंदिवस झपाट्याने बदलत असून, प्रवाशांच्या दैनंदिन प्रवासात सोय, सुरक्षितता आणि सुविधा वाढविण्याचा उपक्रम वेगाने पुढे सरकत आहे. “ठाणेकरांसाठी अधिक सोयीस्कर, आधुनिक आणि स्वच्छ स्थानक उभं करण्याचा माझा निर्धार आता साकाराच्या मार्गावर आहे,” असे खासदार नरेश म्हसके यांनी ठाणे रेल्वे स्थानकाच्या पाहणीदरम्यान सांगितले.

स्थानकावरील फलाट क्रमांक २, ३ आणि ४ यांची लांबी वाढविण्याचे काम जलद गतीने सुरू असून आता १५ डब्यांच्या लोकल गाड्या धावण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. वाढत्या प्रवासी गर्दीचा विचार करता हे काम अत्यंत गरजेचे ठरले आहे. येत्या ३१ डिसेंबरपासून ठाणेकरांना या विस्तारित फलाटांवरून प्रवास करता येणार असल्याची माहिती खासदार म्हसके यांनी दिली.

प्रवाशांच्या सोयीसाठी एक्सलेटर बसविण्याचे कामही पूर्णत्वाच्या टप्प्यात आहे. फलाट क्रमांक ५ आणि ६ वर चार एक्सलेटर कार्यान्वित झाले असून, आणखी एक लवकरच सुरू होणार आहे. वयोवृद्ध, महिला आणि लहान मुलांसाठी अधिक सोयी निर्माण करण्याच्या दृष्टीने फलाट क्रमांक ७, ८, ९ आणि १० वरही एक्सलेटर बसविण्याच्या सूचना रेल्वे अधिकाऱ्यांना देण्यात आल्या असल्याचे खासदार म्हसके यांनी सांगितले.

स्थानकाच्या स्वच्छतेसाठी डी मार्ट कंपनीशी करार करण्यात आला असून, “स्वच्छतागृहांची नियमित निगा राखली जावी आणि दर्जा टिकवावा,” अशा स्पष्ट सूचना त्यांच्या प्रतिनिधींना देण्यात आल्या आहेत. “ठाणे स्थानक स्वच्छ आणि आकर्षक ठेवण्यासाठी आमचा प्रयत्न कायम सुरू आहे,” असेही म्हसके यांनी नमूद केले.




पावसाळ्यात रुळांवर साचणाऱ्या पाण्यामुळे प्रवाशांना भेडसावणाऱ्या अडचणी टाळण्यासाठी ‘मायक्रोटेक’ संस्थेमार्फत भूमिगत वाहिन्या टाकण्याचे काम सुरू आहे. यामुळे पाणी लवकर निचरेल आणि लोकल गाड्यांना विलंब होणार नाही. हे काम डिसेंबरअखेर पूर्ण होण्याची अपेक्षा आहे.

प्रवाशांना स्वच्छ पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी फिल्टर डेपो उभारण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. “प्रवाशांच्या मूलभूत गरजांपैकी ही एक महत्त्वाची गरज आहे, आणि ती पूर्ण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत,” असे म्हसके यांनी सांगितले.

पाहणीदरम्यान मध्य रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. कामांचा प्रत्यक्ष आढावा घेताना खासदार म्हसके यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “प्रवाशांच्या सुविधांबाबत कोणतीही टाळाटाळ चालणार नाही आणि कामाच्या दर्जाबाबत कोणतीही शिथिलता खपवून घेतली जाणार नाही.”

नवीन वर्षात ठाणे रेल्वे स्थानक अधिक सुरक्षित, स्वच्छ आणि आधुनिक बनणार असून ठाणेकरांना नव्या सुविधा अनुभवायला मिळतील, अशी ग्वाही खासदार नरेश म्हसके यांनी दिली.







Tags :  #NareshMhaske #ThaneRailwayStation #ThaneDevelopment #ModernThane #RailwayUpgradation #PublicConvenience #SmartCityThane #PassengerSafety #CleanStation #InfrastructureDevelopment #EaseOfTravel #CentralRailway #BetterFacilities #UrbanProgress #ThaneCity

Post a Comment

Previous Post Next Post