ठाणे महापालिका आणि ‘अर्पण’ संस्थेचा उपक्रम
ठाणे : बाल लैंगिक शोषण निर्मूलनासाठी कार्यरत आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्वयंसेवी संस्था अर्पण आणि ठाणे महानगरपालिका तसेच ठाणे महापालिका परिवहन उपक्रम यांच्या संयुक्त विद्यमाने ‘बाल सुरक्षा सप्ताह २०२५’ या जनजागृती उपक्रमाचा भव्य शुभारंभ करण्यात आला. ठाण्यातील एका विशेष कार्यक्रमात या अभियानाचा प्रारंभ झाला असून, यावेळी खासदार नरेश म्हस्के, आयएएस अधिकारी आणि ठाणे महानगरपालिका आयुक्त सौरभ राव, अर्पण संस्थेच्या संस्थापिका व मुख्य कार्यकारी अधिकारी पूजा तापडिया यांसह विविध मान्यवरांची उपस्थिती होती.
ठाणे परिवहन उपक्रमाच्या ३८५ बसगाड्यांमध्ये ‘बाल सुरक्षा सप्ताह’ अभियानाचे संदेश प्रदर्शित करण्यात आले असून, शहरातील नागरिकांना बाल लैंगिक शोषण, त्याचे परिणाम आणि पॉक्सो कायद्याचे महत्त्व याबाबत जनजागृती केली जात आहे. हजारो प्रवाशांपर्यंत हा संदेश पोहोचविण्यासाठी हा उपक्रम अत्यंत प्रभावी ठरत आहे.
अभियानाचा धाडसी संदेश
“जर तुम्ही मुलांचे शोषण कराल, तर पोक्सो पकडेल”
यावर्षीच्या अभियानाचा मुख्य विषय अतिशय थेट, स्पष्ट आणि कठोर संदेश देणारा आहे.
“जर तुम्ही कोणत्याही मुलाचे लैंगिक शोषण कराल, तर तुम्हाला पॉक्सो पकडेल.”
या मोहिमेद्वारे शोषणकर्त्यांना कायद्याची कठोर शिक्षा अधोरेखित करत समाजात जागरूकता निर्माण केली जात आहे.
विद्या बालन यांचा सहभाग, विशेष जनजागृती फिल्मचे प्रदर्शन
प्रसिद्ध अभिनेत्री विद्या बालन यांनी या मोहिमेला पाठिंबा देत प्रमुख भूमिका असलेली विशेष जनजागृती फिल्म तयार करण्यात आली आहे. ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या हस्ते या फिल्मचे प्रदर्शन करण्यात आले. पुढील काळात ही फिल्म ठाणेतील सर्व चित्रपटगृहांमध्ये दाखवण्याचे नियोजन करण्यात येणार असल्याची माहितीही देण्यात आली.
कार्यक्रमात बोलताना खासदार नरेश म्हस्के यांनी पोक्सो कायदा जनमानसात अधिक प्रभावीपणे पोहोचवण्याची गरज व्यक्त केली. पालक आणि शिक्षक सक्षम झाले, तर बाल सुरक्षिततेचे प्रमाण वाढेल, असे त्यांनी सांगितले. अर्पण संस्थेच्या उपक्रमाचे त्यांनी विशेष कौतुक केले. महापालिका आयुक्त सौरभ राव म्हणाले, प्रत्येक दिवस हा बाल सुरक्षेचा असायला हवा. ठाण्यातील प्रत्येक मुल सुरक्षित ठेवण्याचे वचन पाळण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
अर्पण संस्थेच्या संस्थापिका आणि सीईओ पूजा तापडिया यांनी सांगितले की, मुलांचे रक्षण ही सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. ठाणे महानगरपालिका आणि परिवहन विभागाने दिलेल्या सहकार्यामुळे बाल सुरक्षा संदेश शहराच्या प्रत्येक कोपऱ्यात पोहोचेल. पोक्सो कायद्याच्या अंमलबजावणीनंतर महाराष्ट्रात बाल लैंगिक शोषणाच्या प्रकरणांच्या नोंदीत ८.५ पट वाढ झाली आहे. त्यामुळे सातत्याने जनजागृती करणे आवश्यक असल्याचे अर्पणच्या प्रतिनिधींनी स्पष्ट केले.


