विकास रेपाळे यांचे प्रतिपादन
रेपाळे म्हणाले, “ठाण्यातील अनेक क्रिकेटपटूंमध्ये अपार क्षमता असूनही संधींचा अभाव होता. आता एमसीएच्या माध्यमातून या खेळाडूंना दर्जेदार सुविधा, दर्जेदार सराव केंद्रे आणि संधी उपलब्ध करून देणार आहोत.”
शिवसेना मुख्यनेते आणि खासदार एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक, राजकीय आणि क्रीडा क्षेत्रात काम करत असल्याचा उल्लेख त्यांनी केला. ठाण्यातील खेळाडूंना मर्यादित सुविधा असतानाही मुंबईतील मैदानांवर त्यांनी प्रभावी कामगिरी दाखवली आहे. त्यामुळेच ठाण्यात सर्व सोयी-सुविधांनी युक्त एमसीएचे केंद्र उभारण्याचा त्यांचा मनोदय आहे.
याशिवाय, ठाणेकरांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दर्जाच्या खेळाची अनुभूती स्थानिक पातळीवर मिळावी यासाठी दादोजी कोंडदेव क्रीडा प्रेक्षागृहात विविध सामन्यांचे आयोजन करण्याची त्यांच्या योजना आहे.
रेपाळे यांचा ठाणे शहराशी असलेला क्रीडा संबंधही भक्कम आहे. त्यांनी यापूर्वी ठाणे महापालिकेच्या शिक्षण मंडळाचे अध्यक्षपद भूषवले होते. तसेच ‘महाराष्ट्र माझा सेवा संस्था’ मार्फत ते ठाणे प्रीमिअर लीग (TPL) टी–२० स्पर्धेचे दीर्घकाळ आयोजन करत आहेत. TPL च्या माध्यमातून अनेक युवा क्रिकेटपटूंना आयपीएल तसेच राष्ट्रीय पातळीवर खेळलेल्या दिग्गजांसोबत खेळण्याची संधी मिळाली आहे. होतकरू खेळाडूंना सतत मदतीचा हात देणारे क्रीडाप्रेमी म्हणूनही रेपाळे ओळखले जातात.
एमसीएमध्ये ठाण्याचे प्रतिनिधित्व करणारा व्यक्ती म्हणून विकास रेपाळे पुढे आल्याने ठाणेकरांच्या अपेक्षा उंचावल्या असून, ठाण्याच्या क्रिकेटला नवे उंचीचे क्षितिज लाभेल अशी आशा व्यक्त केली जात आहे.
