जळगाव : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) तर्फे राज्यभर सुरू करण्यात आलेल्या ‘अमृत दुर्गोत्सव २०२५’ या अनोख्या उपक्रमाची सुरुवात आता जळगाव जिल्ह्यातही झाली आहे.
या उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील नागरिकांनी आपल्या घराच्या अंगणात, गॅलरीत किंवा सोसायटी परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील युनेस्कोने घोषित केलेल्या १२ दुर्गांपैकी कोणत्याही एका दुर्गाची प्रतिकृती तयार करायची आहे. त्यानंतर त्या प्रतिकृतीसोबत सेल्फी किंवा छायाचित्र काढून ते www.durgutsav.com या अधिकृत संकेतस्थळावर अपलोड करायचे आहे.
विशेष म्हणजे, हा कार्यक्रम कोणतीही स्पर्धा नसून शिवकालीन दुर्गसंस्कृतीचा गौरव, अभिमान आणि वारसा जागतिक स्तरावर पोहोचविण्याचा एक जनसहभागात्मक उपक्रम आहे. महाराष्ट्राच्या गौरवशाली इतिहासातील दुर्गसंवर्धनाचे महत्त्व समाजात रुजविणे, हे यामागील प्रमुख उद्दिष्ट आहे.
या उपक्रमात सहभागी होणाऱ्या प्रत्येक नागरिकाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्वाक्षरीसह अभिनंदनपत्र ऑनलाईन स्वरूपात प्राप्त होणार आहे, अशी माहिती अमृतचे जिल्हा व्यवस्थापक राजेंद्र कानडे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
या अभिनव उपक्रमामुळे जिल्ह्यात ऐतिहासिक वारसा, देशभक्ती आणि संस्कृतीबद्दलची जाणीव अधिक दृढ होणार असल्याची भावना विविध सामाजिक संघटनांनी व्यक्त केली आहे.
