निवडणूक अधिकाऱ्यांसमोर यादी फाडली
ठाणे : ठाणे महापालिकेतील मतदार याद्यांमधील सुरू असलेला गोंधळ आणि त्रुटींचा मुद्दा सोमवारी पुन्हा एकदा तीव्र झाला. मनसे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांच्या नेतृत्वाखालील मनसे पदाधिकाऱ्यांच्या प्रतिनिधीमंडळाने महापालिकेच्या निवडणूक विभागाला भेट देत हा गोंधळ प्रत्यक्ष अधिकाऱ्यांच्या लक्षात आणून दिला.
याद्यांतील विसंगती, एकाच घरातील नागरिकांची वेगवेगळ्या प्रभागांमध्ये नोंद, मृत व्यक्तींची नावे दिसणे, तसेच स्थलांतरित नागरिकांची नोंद कायम राहणे असे गंभीर प्रकार दस्तऐवज आणि नकाशांसह अधिकाऱ्यांना दाखवूनही ते स्वतःची चूक मान्य करण्यास तयार नसल्याचे जाधव यांनी सांगितले.
अधिकाऱ्यांकडून समाधानकारक प्रतिसाद न मिळाल्याने संतप्त मनसे पदाधिकाऱ्यांनी निवडणूक विभागासमोरच मतदार यादीतील गोंधळाचे नकाशे फाडत तीव्र निषेध नोंदवला. “मतदार याद्यांमध्ये मुद्दाम गोंधळ ठेवून निवडणूक प्रक्रियेवर परिणाम करण्याचा प्रयत्न होत आहे. ही मनमानी ताबडतोब थांबवावी,” अशी जोरदार मागणी अविनाश जाधव यांनी यावेळी केली.
मनसेने निवडणूक व्यवस्थेतील पारदर्शकतेसाठी पुढील काही दिवसांत व्यापक मोहिम छेडण्याचा इशारा देत, गरज भासल्यास आंदोलनाची रणनीती आखली जाणार असल्याचेही स्पष्ट केले.
