‘बे दुणे तीन’ ५ डिसेंबरपासून प्रेक्षकांच्या भेटीस



 ZEE5 प्लॅटफॉर्मवर ओरिजिनल मराठी मालिका

ठाणे : मराठी मनोरंजनासाठी लोकप्रिय असलेल्या मराठी ZEE5 प्लॅटफॉर्मने आपल्या आगामी ओरिजिनल मालिका ‘बे दुणे तीन’ चा ट्रेलर प्रदर्शित केला आहे. ही मालिका ५ डिसेंबर २०२५ रोजी प्रीमियर होणार असून आधुनिक नातेसंबंधांतील गोंधळ, भावनिक चढ-उतार आणि हळुवार विनोदाने सजलेली कथा यातून अनुभवायला मिळणार आहे.

दीक्षा केतकर, विराजस कुलकर्णी, शुभांकर एकबोटे, क्षितीश दाते, पुष्करराज चिरपुटकर आणि शिवाणी रांगोळे यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या मालिकेत अभय आणि नेहा या तरुण दाम्पत्याच्या आयुष्यात एकाच वेळी तीन बाळं होणार असल्याची धक्कादायक माहिती मिळाल्यानंतर सुरू होणारी मजेदार अनागोंदी दर्शविण्यात आली आहे. दिग्दर्शक अथर्व सौंदणकर व हिमांशू पिले, तर निर्मिती वृषांक प्रॉडक्शन्स यांनी केली आहे.

या मालिकेची कथा भूतकाळ, वर्तमान आणि भविष्य अशा तीन कालपटांवर पुढे सरकत जोडप्यांच्या आयुष्यातील भावनिक नातेसंबंध, पालकत्वाची जबाबदारी आणि एकमेकांवरील प्रेमाचा प्रवास उलगडते. नात्यातील विनोद, गोड-तिखट प्रसंग आणि वास्तववादी अभिनय यांचा सुरेख संगम ‘बे दुणे तीन’मध्ये दिसून येतो.

मराठी ZEE5 च्या बिझनेस हेड हेमा व्ही.आर. म्हणाल्या, “महाराष्ट्रीयन घरांतील मनाला भिडणाऱ्या आणि वास्तवाशी निगडित कथा प्रेक्षकांसमोर आणण्यात आम्हाला अभिमान वाटतो. ‘बे दुणे तीन’ ही मालिका त्याचेच उत्तम उदाहरण आहे. अभय-नेहाचा प्रवास हा प्रेम, सोबत आणि पालकत्वातील नात्यांवरील आपुलकी यांचा अनोखा संगम आहे. प्रेक्षक या कथेशी जोडले जातील, असा आम्हाला विश्वास आहे.”

वृषांक प्रॉडक्शन्सच्या प्रतिनिधींनी सांगितले की, “एका जोडप्याला एकाचवेळी तीन बाळं होणार असल्याची कल्पना ही आयुष्याच्या अनिश्चिततेचे प्रतीक आहे. या कथेत विनोद, भावना आणि वास्तव यांचे सुंदर मिश्रण दिसते. ZEE5 सोबतची आमची ही निर्मिती प्रेक्षकांच्या मनात घर करेल, याची आम्हाला खात्री आहे.”

दिग्दर्शक अथर्व सौंदणकर व हिमांशू पिले म्हणाले की, “अभय-नेहाचे नाते हे वास्तववादी, दोषांसह पण प्रेमाने परिपूर्ण असे आहे. त्यांच्या गोंधळलेल्या आयुष्यातील हसरे, भावनिक आणि आत्मीय क्षण प्रेक्षकांना भिडतील.”

अभयची भूमिका साकारणारे क्षितीश दाते म्हणाले, “ही मालिका वास्तवाशी खूप जवळची वाटते. तीन बाळांचा वडील होण्याची अचानक आलेली जबाबदारी, भावनिक गोंधळ आणि हळवे क्षण हा एक अनोखा अनुभव आहे. प्रत्येक जोडपे स्वतःचे प्रतिबिंब या कथेत पाहील.”

‘बे दुणे तीन’ ही मालिका ५ डिसेंबर २०२५ पासून फक्त मराठी ZEE5 वर प्रदर्शित होणार आहे.

Post a Comment

Previous Post Next Post