चाहत्यांची मोठी गर्दी, कडेकोट बंदोबस्त
मुंबई : ज्येष्ठ अभिनेते, हिंदी चित्रपटसृष्टीतील अजरामर नाव धर्मेंद्र यांचे आज निधन झाले असून त्यांच्या पार्थिवावर विलेपार्ले येथील सेवा समाज संचलित हिंदू स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार, पार्थिवाला सनी देओल यांनी मुखाग्नी दिला.
धर्मेंद्र यांचा अखेरचा दर्शन glimpse घेण्यासाठी विलेपार्ले स्मशानभूमीबाहेर चाहत्यांची मोठी गर्दी उसळली होती. गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी मुंबई पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. बॉलिवूडसह भारतीय चित्रपटसृष्टीतील अनेक दिग्गज कलाकारांनी स्मशानभूमीत हजेरी लावून धर्मेंद्र यांना श्रद्धांजली अर्पण केली.
स्मशानभूमीच्या आत चित्रपटसृष्टीतील कलाकार आणि कुटुंबीयांशिवाय कोणालाही प्रवेश देण्यात आला नाही. माध्यम प्रतिनिधी व इतरांना प्रवेश नाकारण्यात आला. गेटच्या दोन्ही बाजूंना मोठ्या प्रमाणात सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले होते. गेटबाहेर मुंबई पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त होता, तर केंद्रीय सुरक्षा दल (CISF) तैनात होते.
धर्मेंद्र यांना ३१ ऑक्टोबर रोजी नियमित तपासणीसाठी ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांना श्वसनाचा त्रास जाणवत होता. १० नोव्हेंबरला त्यांची प्रकृती अधिक खालावली आणि कुटुंबीय तत्काळ रुग्णालयात दाखल झाले. हेमा मालिनी, सनी देओल, ईशा देओल, करण देओल, राजवीर देओल आणि अभय देओल यांनी भेट दिली होती.
१९६० साली ‘दिल भी तेरा हम भी तेरे’ या चित्रपटातून धर्मेंद्र यांनी कारकीर्द सुरू केली. १९६२ मध्ये ‘बॉयफ्रेंड’ चित्रपटात त्यांनी सहाय्यक भूमिकाही साकारली. तब्बल ६५ वर्षांच्या अभिनय प्रवासात धर्मेंद्र यांनी असंख्य सुपरहिट, हिट आणि ब्लॉकबस्टर चित्रपट दिले.

