नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
दिवा \ आरती परब : दिवा पूर्वेतील बी. आर. नगर आणि विकास म्हात्रे गेट परिसरात दोन दिवसांत सुमारे १२ नागरिकांना पिसाळलेल्या कुत्र्यांनी चावा घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. चावलेल्यांमध्ये २ वर्षांची चिमुकलीही असल्याने परिसरात भीतीचे सावट पसरले आहे. संबंधित बालिकेला तातडीने शिवाजी महाराज रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
स्थानिकांच्या मते, बी. आर. नगर आणि विकास म्हात्रे गेट परिसरात भटक्या कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे नागरिक, लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिक सतत भीतीच्या वातावरणात वावरत आहेत. दोन दिवसांत १२ नागरिकांना कुत्रे चावल्याने आरोग्य आणि सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
सध्या परिसरात चार कुत्रे पिसाळल्याची नोंद असून त्यापैकी फक्त एका कुत्र्याला श्वानपथकाने दुपारी पकडून नेले आहे. उरलेल्या तीन कुत्र्यांना तातडीने पकडण्यात यावे, अशी मागणी स्थानिक रहिवासी करत आहेत. तसेच कुत्र्यांचे निर्बीजीकरण, रेबिज लसीकरण आणि वाढलेल्या कुत्र्यांच्या संख्येवर नियंत्रण आणण्यासाठी पालिकेने तत्काळ उपाययोजना कराव्यात, अशीही मागणी होत आहे.
अनिल पवार, स्थानिक नागरिक - “कालपासून बी. आर. नगर परिसरात लोकांना चावणारा कुत्रा अखेर श्वानपथकाने आशा वर्कर जिजाबाई बावा यांच्या मदतीने पकडला आहे. मात्र उर्वरित कुत्र्यांना पकडण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींनी पालिकेकडे लेखी निवेदन द्यावे लागेल, असे श्वानपथक कर्मचाऱ्यांनी सांगितले.”
दरम्यान, या घटनांमुळे पालिकेच्या निष्क्रियतेबद्दल नागरिकांमध्ये संताप असून, कुत्र्यांचा बंदोबस्त न केल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा स्थानिकांनी दिला आहे.
