कोल्हापूर \ शेखर धोंगडे : महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या श्री महालक्ष्मीदेवीच्या वार्षिक किरणोत्सवास उद्या, ९ नोव्हेंबरपासून औपचारिक प्रारंभ होत आहे. त्याआधी आज (८ नोव्हेंबर) सायंकाळी नेमके ५ वाजून ४२ मिनिटांनी मावळत्या सूर्यकिरणांनी देवीच्या चरणांना स्पर्श करून या दिव्य सोहळ्याची पूर्वपीठिका रचली. क्षणभरासाठी गाभार्यात तेजाचा साक्षात्कार घडला आणि उपस्थित भाविक मंत्रमुग्ध झाले. यानंतर सूर्यकिरणांचा प्रवास देवीच्या खांद्यापर्यंत झाला आणि काही क्षणांनी ते लुप्त झाले. आज शनिवारची सुटी असल्याने मंदिर परिसरात भाविकांची प्रचंड गर्दी उसळली होती. तब्बल ८ लाख ५१ हजारांहून अधिक भाविकांनी या दिव्य दृश्याचे दर्शन घेतले.
श्री महालक्ष्मीदेवी मंदिरातील किरणोत्सव वर्षातून दोनदा उत्तरायण आणि दक्षिणायन अशा काळात होतो. उत्तरायण किरणोत्सव ३१ जानेवारी, १ व २ फेब्रुवारीला, तर दक्षिणायन किरणोत्सव ९, १० व ११ नोव्हेंबरला साजरा केला जातो. या तिन्ही दिवसांत सूर्यकिरण महाद्वारातून आत प्रवेश करून पहिल्या दिवशी देवीच्या चरणांना, दुसऱ्या दिवशी पोटाला आणि तिसऱ्या दिवशी मुख व संपूर्ण मूर्तीला स्पर्श करतात. त्या क्षणी गाभाऱ्यातील सर्व विद्युत प्रकाश बंद करून फक्त दोन समया तेवत ठेवतात, ज्यामुळे सूर्यकिरणांचे तेज अधिक प्रभावीपणे दिसते. या वेळी संपूर्ण मंदिर परिसरात घंटानाद, कर्पूरारती आणि ‘जय देवी’च्या घोषात भक्तिरस ओसंडून वाहतो.
या संदर्भात देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे म्हणाले की, “या किरणोत्सवाचा सात दिवसांचा सविस्तर अभ्यास आम्ही करीत आहोत. ७ नोव्हेंबरला वातावरण ढगाळ असल्याने सूर्यकिरण गाभाऱ्यात पोहोचू शकले नाहीत. मात्र आज (८ नोव्हेंबर) स्वच्छ आकाश असल्याने किरणोत्सव यशस्वीरीत्या पार पडला. हा खगोलीय अभ्यास आम्ही १४ नोव्हेंबरपर्यंत चालविणार आहोत. श्रीक्षेत्र कोल्हापूरात दरवर्षी हजारो भाविक या सोहळ्यासाठी उपस्थित राहतात. सूर्य आणि मंदिर स्थापत्य यांचा संगम पाहायला मिळणारा हा किरणोत्सव विज्ञान, श्रद्धा आणि संस्कृतीचा अद्भुत मिलाफ आहे.
