लोढा ग्रुपशी संबंधित आर्थिक व्यवहारांच्या अनुषंगाने कारवाई; ठाणे-डोंबिवली राजकीय वर्तुळात खळबळ
ठाणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते आणि माजी आमदार राजू पाटील यांचे भाऊ विनोद पाटील यांची आज सकाळी अंमलबजावणी संचालनालय (ED) कडून सुमारे दहा तास चौकशी करण्यात आली. ईडीची टीम सकाळी सुमारे सात वाजता पाटील यांच्या निवासस्थानी पोहोचली आणि संध्याकाळी पाच वाजेपर्यंत चौकशी सुरू होती. या दरम्यान विनोद पाटील यांचा मोबाईल फोन आणि काही महत्त्वाची कागदपत्रे ईडी अधिकाऱ्यांनी जप्त केल्याची माहिती समोर आली आहे.
ही चौकशी लोढा ग्रुपचे भागीदार राजेंद्र लोढा यांच्याशी संबंधित आर्थिक व्यवहारांच्या पार्श्वभूमीवर करण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, लोढा ग्रुपवरील विश्वासघात आणि फसवणुकीच्या प्रकरणी ईडीकडून सखोल तपास सुरू आहे, आणि या प्रकरणातील काही आर्थिक व्यवहारांमध्ये विनोद पाटील यांचे नाव समोर आल्याने आजची चौकशी पार पडली.
सूत्रांच्या माहितीनुसार, १९९४ पासून पाटील कुटुंब आणि लोढा कुटुंबीयांमध्ये आर्थिक संबंध असल्याचे ईडीला आढळले आहे. त्या काळातील काही निधी हस्तांतरण आणि व्यवहारांच्या उद्देशाबाबत अधिकाऱ्यांनी सविस्तर विचारपूस केली.
विनोद पाटील यांचा जबाब नोंदवून ईडीची टीम सायंकाळी मुंबईकडे रवाना झाली. या कारवाईनंतर ठाणे आणि डोंबिवलीच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
लोढा ग्रुपच्या व्यवहारातील आर्थिक अनियमिततेचा तपास सुरू असल्याने, आगामी काही दिवसांत आणखी काही नावे समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
