कोल्हापूर \ शेखर धोंगडे : मानवतेचा आणि प्रामाणिकतेचा सुंदर नमुना कोल्हापूर शहरात पाहायला मिळाला. दिलबर तालीम येथून प्रवासी घेऊन निघालेल्या रिक्षाचालक रामचंद्र जाधव ( ५९, रा. लक्षतीर्थ वसाहत, कोल्हापूर) यांनी आपल्या प्रवाशाची चार लाख रुपयांची पिशवी सापडल्यानंतर ती कोणतीही लालसा न ठेवता थेट पोलिसांच्या स्वाधीन केली.
मंगळवारी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास रिक्षाचालक जाधव यांनी आपली प्रवासी रिक्षा (क्रमांक MH09 G 8025) द्वारे अथर्व नारायण पुजारी (रा. नरसोबाची वाडी) यांना महाद्वार रोड येथे सोडले. काही वेळाने रिक्षामध्येच त्या प्रवाशाची ४,००,००० रक्कम असलेली पिशवी विसरल्याचे जाधव यांच्या लक्षात आले. त्यांनी कोणतीही विलंब न लावता ती पिशवी थेट जुना राजवाडा पोलीस ठाण्यात आणून जमा केली.
दरम्यान, दोन तासांनी अथर्व पुजारी हे आपल्या हरवलेल्या रकमेची तक्रार नोंदवण्यासाठी पोलीस ठाण्यात आले असता, पोलीसांनी शहानिशा करून तीच रक्कम असल्याची खात्री करून पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांच्या हस्ते प्रवाशास परत करण्यात आली. या प्रामाणिक वर्तणुकीबद्दल पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांनी रिक्षाचालक रामचंद्र जाधव यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. मानवी मूल्यांची जपणूक करणाऱ्या अशा प्रामाणिक नागरिकांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

