दिवा \ आरती परब : ठाणे महानगरपालिकेच्या प्राथमिक शाळा क्रमांक ८१, शिळ गाव येथे भारतीय संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शाळेच्या मुख्याध्यापिका वंदना बाऊस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमात पहिली ते सातवीच्या सर्व विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग घेतला. यावेळ मेघा घाडगे यांनी भारतीय संविधानाची उद्देशिका वाचन करून विद्यार्थ्यांना संविधानाचे महत्त्व समजावून सांगितले. शाळेचे वरिष्ठ शिक्षक पोपट धादवड यांनी भारतीय संविधान दिन का साजरा केला जातो, याविषयी माहिती देत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचा उल्लेख केला. तसेच शिक्षक किरण चौधरी यांनी संविधानातील मूलभूत अधिकार, कर्तव्ये व वैशिष्ट्ये विद्यार्थ्यांना सोप्या भाषेत सांगितली.
कार्यक्रमानंतर विद्यार्थ्यांनी शिळ गाव परिसरात संविधान जनजागृती रॅली काढून नागरिकांमध्ये संविधानाबाबत जागरूकता निर्माण केली. या प्रसंगी तुषार परब (परिचर) तसेच शाळेतील सर्व शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये नागरिकत्वाची जाणीव व संविधानाबद्दल आदर निर्माण झाल्याचे शिक्षकांनी सांगितले.
