महिलांमध्ये सरस्वती कन्या वि ओम साईश्वर



पुरुषांमध्ये श्री समर्थ विद्यार्थी अंतिम फेरीत भिडणार

पुरुष आणि महिला मुंबई जिल्हा अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धा २०२५-२६


मुंबई  :  मुंबई खो-खो संघटनेच्या मान्यतेने, कै. दत्ताराम गायकवाड फाउंडेशन पुरस्कृत आणि ओम साई ईश्वर सेवा मंडळ, लालबाग यांच्या आयोजनात सुरु असलेल्या मुंबई जिल्हा अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धा २०२५-२६ मध्ये महिला व पुरुष गटातील अंतिम फेरीचे चित्र स्पष्ट झाले आहे. महिला गटात सरस्वती कन्या वि ओम साईश्वर, तर पुरुष गटात श्री समर्थ व्यायाम मंदिर व विद्यार्थी क्रीडा केंद्र यांच्यात निर्णायक लढत रंगणार आहे.


महिलांच्या उपांत्य फेरीत ओम साईश्वर सेवा मंडळाने शिवनेरी सेवा मंडळावर ५-४ (मध्यंतर ५-१) असा एक डाव राखून दणदणीत विजय मिळवला. या सामन्यात वैष्णवी परबने दोन्ही डावात एकूण ४.३० मिनिटांचे दमदार संरक्षण करून विजयावर शिक्कामोर्तब केले. तिच्या साथीला कादंबरी तेरवणकरने ४.३० व २.१० मिनिटांचे नाबाद संरक्षण करत २ गुण मिळवले, तर इशाली आंब्रेने २ मिनिटांचे संरक्षण करून संघाच्या विजयात मोलाची भर टाकली.


पराभूत संघातील आरुषी गुप्ताने ३.५० मिनिटांचे संरक्षण केले, कार्तिकी कणसेने १.१० मिनिटांत २ गुण मिळवले, तर मुस्कान शेखने १.५० मिनिटांचे संरक्षण करत झुंजार प्रयत्न केला. दुसऱ्या उपांत्य फेरीत सरस्वती कन्या संघाने अमरहिंद मंडळावर ४-३ असा साडेसहा मिनिटांचा डाव राखून विजय मिळवला. शेजल यादवने ४.३० व ४.५० मिनिटांचे संरक्षण करत आक्रमणात २ गुण मिळवले. खुशबू सुतारने ४.१० मिनिटांचे नाबाद संरक्षण आणि १ आक्रमक गुण मिळवला. जान्हवी लोंढेने २.३० मिनिटांचे संरक्षण करत संघाला अंतिम फेरीत पोहोचवले.


पराभूत अमरहिंदच्या संजना कुडवने ४.२० मिनिटांचे संरक्षण केले; देविशा म्हात्रेने १.५० मिनिटांचे संरक्षण आणि आक्रमणात २ गुण मिळवले; तर रुद्रा नाटेकर, तन्वी उपळकर व रिद्धी कबीर यांनी प्रत्येकी जोरदार संरक्षण करून प्रयत्न केला. पुरुषांच्या पहिल्या उपांत्य सामन्यात दादरच्या श्री समर्थ व्यायाम मंदिराने माहीमच्या ओम समर्थ भारत व्यायाम मंदिरावर १५-१३ (मध्यंतर १५-७) असा एक डाव २ गुणांनी विजय मिळवला. प्रतीक होडावडेकरने १.३० मिनिटांचे संरक्षण करत आक्रमणात ३ गडी बाद केले; यश बोरकरने २.१० आणि १.४० मिनिटांचे संरक्षण करत २ गडी बाद केले. वरद भाटक, ओम भरणकर आणि हितेश आग्रे यांनी प्रत्येकी २ खेळाडू बाद केले. ओम समर्थच्या सनी तांबेने १.३० मिनिटांत ५ खेळाडू बाद करून रंगत निर्माण केली; तर प्रशिक मोरे आणि सोहम विलणकर यांनी प्रत्येकी २ गडी बाद करत चुरशीची लढत दिली.


दुसऱ्या उपांत्य फेरीत विद्यार्थी क्रीडा केंद्राने सरस्वती स्पोर्ट्स क्लबवर ११-१० (मध्यंतर ५-५) असा एका गुणाचा निसटता विजय मिळवत अंतिम फेरीत स्थान निश्चित केले. जनार्दन सावंतने १.५० आणि २ मिनिटांचे संरक्षण करत २ खेळाडू बाद केले; प्रतीक घाणेकर, शुभम शिंदे आणि सम्यक जाधव यांनी प्रत्येकी २ गडी बाद करत विजयात भर घातली. सरस्वती स्पोर्ट्स क्लबच्या करण गरोळेने ३ खेळाडू बाद केले; राहुल जावळेने ३ मिनिटांचे संरक्षण करत ३ खेळाडू बाद केले, तर रोहन टेमकर व श्रेयस राऊळ यांनी प्रत्येकी एकेक खेळाडू बाद केला. मात्र संघाला पराभवापासून वाचवता आले नाही.




Post a Comment

Previous Post Next Post