महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची आयुक्तांकडे मागणी
दिवा \ आरती परब : ठाणे महापालिका कार्यक्षेत्रातील दिवा प्रभाग समिती अंतर्गत येणाऱ्या शिळफाटा जंक्शन येथील प्रमुख चौकाला ‘स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज चौक’ असे नाव देण्यात यावे, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विभाग अध्यक्ष शरद गुणाजी पाटील यांनी केली आहे. याबाबतचे निवेदन त्यांनी ठाणे महानगरपालिकेच्या आयुक्तांना दिले आहे.
दिवा, डोंबिवली, नवी मुंबई व पनवेल या महत्त्वाच्या शहरांना जोडणाऱ्या या जंक्शनला प्रवाशांच्या दृष्टीने अत्यंत गर्दीचे आणि प्रमुख ठिकाण मानले जाते. या चौकाचे नामकरण छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावाने झाल्यास, नागरिकांना त्यांच्या पराक्रमाची व बलिदानाची आठवण सतत राहील, असे पाटील यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे.
स्थानिक नागरिकांच्या भावना लक्षात घेऊन आणि इतिहासातील प्रेरणास्थान ठरलेल्या या महान व्यक्तिमत्वाच्या स्मरणार्थ चौकाचे नामकरण करण्यात यावे, अशी विनंती मनसेकडून करण्यात आली आहे.
