बेतवडे गावातून गेल्या १४ वर्षांपासून साई पालखी अविरत सुरू

 


दिवा \ आरती परब : दिवा शहरातील बेतवडे गावातील ओम साई सेवा मंडळ, बेतवडे माध्यमातून गेल्या १४ वर्षांपासून बेतवडे, दिवा ते शिर्डी पदयात्रा आणि साई पालखी निघते. या पदयात्रेत दिवा, डोंबिवली आणि कल्याणमधील अनेक साईभक्त आनंदाने, उत्साहाने सहभागी होत असतात. काल ही साई पदयात्रा ओम साईच्या गजरात निघाली.


डोंबिवलीतील सागाव येथील पिंपळेश्वर महादेव मंदिरात साईंची पालखी येताच पिंपळेश्वर महादेव मंदिर संस्थाचे सचिव पंढरीनाथ पाटील यांनी ओम साई सेवा मंडळचे अध्यक्ष विजय भोईर, आयोजक सुधाकर पाटील, खजिनदार किशोर पाटील, सल्लागार मधुकर पाटील तसेच कार्यकारी मंडळासह पालखीच्या भोईचे स्वागत केले. यावेळी महिला- पुरुष भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते. पिंपळेश्वर मंदिर येथे जमलेल्या भक्तांनी साईंच्या पालखीचे दर्शन घेऊन यथासांग पूजा केली.




या श्री क्षेत्र शिर्डी पदयात्रा व पालखी सोहळ्याला ग्रामस्थ मंडळ बेतवडे, ओम साई मित्र मंडळ आडीवळी, गोळवली, वारकरी सांप्रदाय, भजन व हरिपाठ मंडळ, मॅरेथॉन ग्रुप बेतवडे व सदाशिव पाटील यांचे विशेष सहकार्य मिळाले आहे. काल ओम साई, श्री साई असा गजर करीत दिव्यातील बेतवडे येथून निघालेली साई पालखीसह पदयात्रा सांगाव येथील तीर्थक्षेत्र पिंपळेश्वर मंदिरात आली. साईंच्या दर्शनासाठी जमलेल्या भक्तांनी पालखीचे दर्शन घेतले. मंदिराच्या आवारात साईभक्तांसाठी महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली होती.


 गेली १४ वर्ष पदयात्रेसह साईंची पालखी शिर्डीला जाते. साईंची पदयात्रा कार्यक्रम आठवड्याचा असतो. रोज पायी चालत यात्रेकरू शिर्डीला पोहचतात. रात्री ठराविक स्थानी मुक्काम करून पुढचा प्रवास सुरु होतो, अशी माहिती पोलीस पाटील किशोर पाटील यांनी दिली. त्यांनी पुढे सांगितले की, साईभक्तांना त्रास होऊ नये म्हणून भक्तांच्या डोक्यावर साईबाबांचा हात असतो. या पदयात्रेचे नियोजन असते, त्याप्रमाणेच त्याची अंमलबजावणी करण्यात येते, असे ओम साई सेवा मंडळचे अध्यक्ष विजय भोईर यांनी सांगितले.


या पदयात्रेच्या वेळी आमदार राजेश मोरे, माजी उपमहापौर रमाकांत मढवी, माजी नगरसेवक दर्शना म्हात्रे, दीपाली पाटील,शिवसेना युवा अधिकारी साक्षी मढवी, उमेश भगत, चरणदास म्हात्रे, विनोद मढवी, पिंपळेश्वर मंदिर ट्रस्टी पंढरीनाथ पाटील यांनी साईंच्या पालखीचे दर्शन घेतले.



Post a Comment

Previous Post Next Post