शिवसेनेच्या नव्या शाखेचे भव्य उद्घाटन
दिवा \ आरती परब : मुंब्रा परिसरातील शिवसैनिकांसाठी ऐतिहासिक आणि अभिमानाचा क्षण ठरला आहे. मुंब्रा वाय- जंक्शन येथे आज शिवसेनेच्या नव्या शाखेचे उत्साहात उद्घाटन करण्यात आले. विशेष म्हणजे हा सोहळा ढोल- ताशांच्या गजरात आणि जय शिवरायच्या घोषणांनी उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
उद्घाटन मुंब्राचे माजी नगरसेवक राजन किणे यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी शिवसेना उपशाखा प्रमुख आजाद चौगुले, विभागप्रमुख महेश किणे, तसेच मोठ्या संख्येने शिवसैनिक आणि स्थानिक नागरिक उपस्थित होते.
नव्या शाखेची जबाबदारी शब्बीर शेख यांच्याकडे सोपविण्यात आली. त्यांनी बोलताना सांगितले की, “पक्ष संघटन अधिक सक्षम करून नागरिकांच्या सर्व समस्या तत्काळ सोडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.” कार्यक्रमात राजन किणे यांनी शिवसेना ही फक्त राजकीय पक्ष नसून जनतेचा आवाज आहे, असे स्पष्ट केले. त्यांनी पुढे म्हणाले, “तळागाळातील शिवसैनिकांचे योगदान अमूल्य आहे. आपण सर्वांनी एकजुटीने काम करून शिवसेनेची पताका उंच ठेवूया.”
महेश किणे यांनी नव्या शाखेला शुभेच्छा देत सांगितले की, “ही शाखा स्थानिक जनतेसाठी संवाद आणि मदतीचे प्रमुख केंद्र ठरेल.”उद्घाटन सोहळ्यानंतर परिसरात जल्लोषाचे वातावरण पसरले. नागरिकांनी या नव्या शाखेमुळे मुंब्रा परिसरात शिवसेनेची संघटनात्मक ताकद अधिक वाढेल, अशी अपेक्षा व्यक्त केली. कार्यक्रम अत्यंत उत्कृष्ट व्यवस्थापनात पार पडला असून उपस्थितांनी शिवसेना परिवाराची एकता आणि सामर्थ्य अनुभवले.

