२९ नोव्हेंबर ते ६ डिसेंबरदरम्यान रात्री ११ ते पहाटे ५ वाजेपर्यंत रस्ता बंद
ठाणे : कॅडबरी जंक्शन परिसरात सुरु असलेल्या मेट्रो बांधकामासाठी छतावरील पाणी निचरा गटर बसविण्याचे काम करण्यात येणार असल्याने ठाणे पोलिसांनी आठ दिवसांचा रात्रीचा वाहतूक बंदोबस्त लागू केला आहे. हे काम पार पाडण्यासाठी ३० टन क्षमतेचा क्रेन कॅडबरी उड्डाणपुलावर उभा करणे आवश्यक असल्याने २९ नोव्हेंबर ते ६ डिसेंबर या कालावधीत दररोज रात्री ११ ते पहाटे ५ वाजेपर्यंत मुंबई–नाशिक मार्गावरील नितीन ओव्हरब्रिजकडील मुख्य मार्ग बंद ठेवण्यात येणार आहे.
वागळे वाहतूक उपविभागाच्या माहितीनुसार, मुंबईकडून नाशिक–घोडबंदर मार्गाकडे जाणारी सर्व वाहने नितीन ब्रिजच्या चढावाच्या सुरूवातीस असलेल्या डिव्हायडर शेजारीच थांबवली जातील. या ठिकाणी रात्रीची रस्ताबंदी लागू राहणार असून वाहनचालकांना पर्यायी मार्ग वापरणे बंधनकारक असेल.
वाहनचालकांसाठी पर्यायी मार्ग म्हणून स्लिप रोडने नितीन जंक्शनकडे, तेथून कॅडबरी जंक्शनकडे आणि पुढे स्लिप रोडने कळवा कापूरबावडीकडे वळविण्यात येईल. पुढील गंतव्यस्थानाकडे प्रवास करण्यासाठी हाच मार्ग उपलब्ध राहील.
दरम्यान, पोलिस वाहने, अग्निशमन दल, रुग्णवाहिका, ग्रीन कॉरिडॉरची हालचाल आणि ऑक्सिजन पुरवठा करणारी वाहने या निर्बंधांपासून मुक्त राहतील, असेही ठाणे वाहतूक पोलिसांनी स्पष्ट केले आहे.