दिवा \ आरती परब : दिवा परिसरात प्रथमच ग्लोबल इंग्लिश स्कूल तर्फे विद्यार्थ्यांच्या ज्ञानवृद्धीसाठी एक अत्यंत नवोन्मेषी आणि आगळावेगळा उपक्रम राबविण्यात आला आहे. शाळेच्या परिसरात मोबाईल प्लॅनेटोरियमचे आयोजन करून विद्यार्थ्यांना अंतराळ आणि खगोलशास्त्राबाबत प्रत्यक्ष अनुभवातून माहिती देण्याची अनोखी संधी उपलब्ध करून देण्यात आली.
या उपक्रमासाठी शाळेत विशेष डोम सेटअप उभारण्यात आला असून, या डोममध्ये विद्यार्थ्यांना 3D स्वरूपात सौरमाला, ग्रह- तारे, उपग्रह, विश्वाची निर्मिती आणि अंतराळातील विविध घटना अत्यंत आकर्षक पद्धतीने दाखविल्या जात आहेत. हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी अत्यंत रोमांचक, शैक्षणिक आणि प्रेरणादायी ठरत आहे.
शाळा व्यवस्थापनाने सांगितले की, दिवा परिसरात अशा प्रकारची सुविधा प्रथमच विद्यार्थ्यांसाठी आणण्यात आली आहे. विद्यार्थ्यांचे ज्ञान उंचावणे, विज्ञानाची आवड निर्माण करणे आणि आधुनिक तंत्रज्ञानाशी त्यांना जोडणे हा शाळा व्यवस्थापनाचा दूरदृष्टीपूर्ण विचार असून, त्याचा लाभ सर्व विद्यार्थ्यांना मिळत आहे.
ग्लोबल इंग्लिश स्कूलचे हे पाऊल विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वाचे ठरत असून, पालक आणि स्थानिक नागरिकांकडून या उपक्रमाचे विशेष कौतुक करण्यात येत आहे.
